Friday, April 18, 2014

2065 मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची स्वयंचलित यंत्रणा


पुणे (प्रतिनिधी) ः तहसीलदार कचेरीत पडलेला पाऊस म्हणजेच संपूर्ण तालुक्‍यात पडलेला पाऊस ही गेल्या वर्षानुवर्षाची पद्धत आता मोडीत निघणार आहे. खुद्द महसूल विभागानेच ही सुधारणा करत राज्यातील सर्व 2065 मंडळांमध्ये पाऊस मोजण्याची स्वयंचलित यंत्रणा (ऍटोमॅटिक रेनगेज) बसवली आहे. यामुळे पावसाची आकडेवारी अधिक वास्तवदर्शी होणार आहे. गेल्या पावसाळ्यात मंडल स्तरावर हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर येत्या पावसाळ्यात त्याचे महत्व आणखी वाढणार आहे.

मंडळ स्तरावर पाऊस मोजण्याची मागणी केली अनेक वर्षे करण्यात येत होतील. गेली दोन वर्षे त्याबाबत कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर तत्कालिन मुख्य सचिव जयंत बाठीया यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिलेल्या सुचनांनुसार सर्व महसूल मंडळांमध्ये ऍटोमॅटिक रेनगेज बसविण्यात आली. कृषी विभागामार्फत या रेनगेजने नोंदविलेल्या आकडेवारीचे संकलन व पृथःकरण करण्यात येत आहे. यासाठी एनआयसीकडून विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

मंडळाच्या ठिकाणच्या तलाठ्याकडे रेनगेजची आकडेवारी कळविण्याची अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोंदणीकृत मोबाईलवरुन संबंधीत तलाठी ही माहिती पावसाळ्या दररोज अद्ययावत करतात. यंदा बदली झालेल्या तलाठ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरु आहे. निवडणूकीनंतर संबंधीत कर्मचार्यांसाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सांख्यिक अनिल बनसोडे यांनी दिली.

मंडळ स्तरावर बसविण्यात आलेली ही सर्व पर्जन्यमापके प्रत्येकी सुमारे 15 ते 20 हजार रुपये किमतीची आहेत. यापुर्वीच्या पर्जन्यमापकांप्रमाणे नरसाळे बदलण्याचे किंवा मोजमापात चुका होण्याच्या धोके यात नाहीत. स्वयंचलित पद्धतीने पाऊस मोजला जात असल्याने आकडेवारी अधिक बिनचुक मिळण्यास मदत होते. गेल्या वर्षी जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत मंडळ स्तरावर पाऊस मोजण्यात आला. यापुढे वर्षभर ही यंत्रणा सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. www.mahaagri.gov.in/rainfall या संकेतस्थळावर एक जूनपासून मंडळनिहाय पावसाची आकडेवारी पाहता येईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

*चौकट
अतिवृष्टी, खंडांचे यशस्वी मोजणी
मंडळ स्तरावर पाऊस मोजण्यास सुरवात झाल्याने तालुक्‍याच्या विविध भागात पडलेल्या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टीची तिव्रता अधिक चांगल्या विश्‍वासाहार्यतेने स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी कोकण, विदर्भात झालेली अतिवृष्टी, मराठवाडा, खानदेशात पडलेले पावसातील खंड यांचे चित्र तालुकानिहाय पेक्षा मंडळनिहाय पावसाच्या आकडेवारीवरुन अधिक तिव्रतेने स्पष्ट होते. यापुढेही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मंडळनिहाय आकडेवारी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

*कोट
""मंडळ स्तरावरील पावसाची आकडेवारी शेतीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. पुढील तीन वर्षापर्यंत ही आकडेवारी नोंदवल्यानंतर पायाभूत (बेसलाईन) सरासरी तयार होईल. ही सरासरी पिक नियोजनापासून विम्यापर्यंत सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.''
अनिल बनसोडे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय.
-----------(समाप्त)-----------


No comments:

Post a Comment