Monday, April 14, 2014

अंदाज उत्पादनाचा - भाग 2

रब्बीने राखले

अन्नधान्य उत्पादनात भरिव वाढ

पुणे (प्रतिनिधी) ः खरिपाच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसाच्या जोरावर पुरेशी ओल टिकल्याचा फायदा रब्बी पिकांना होवून हंगामातील अन्नधान्य उत्पादनात भरिव वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या तिसऱ्या नजर अंदाजानुसार आधीच्या हंगामाच्या तुलनेत गेल्या रब्बी हंगामात उत्पादकतेत तब्बल 46 टक्‍क्‍यांनी वाढ होवून सुमारे 57 लाख 13 हजार टन अन्नधान्य उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. यात तृणधान्याच्या उत्पादनात 70 टक्‍क्‍यांनी तर कडधान्यांच्या उत्पादनात 90 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार रब्बी 2013-14 मध्ये तृणधान्याचे 39 लाख 86 हजार टन, कडधान्यांचे 17 लाख 27 हजार टन तर तेलबियांचे एक लाख आठ हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. रब्बीचे सर्वाधिक 35 लाख 73 हजार हेक्‍टर क्षेत्र तृणधान्य पिकांखाली आहे. यापैकी सर्वाधिक 22 लाख 44 हजार हेक्‍टर क्षेत्रावर यंदा रब्बी ज्वारी पेरण्यात आली. उर्वरीत क्षेत्रावर गहू, मका आदी पिकांची पेरणी झाली. उत्पादनात मका वगळता इतर सर्व पिकांची सरासरीहून घसरण तर आधीच्या वर्षाहून वाढ असे चित्र आहे.

रब्बी हरभरा पिकाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात भरिव वाढ होत आहे. इतर पिकांना विशेषतः तेलबियांना या वाढीचा फटका बसला आहे. तेलबियांचे सरासरी चार लाख 38 हजार हेक्‍टर क्षेत्र आता एक लाख 85 हजार हेक्‍टरपर्यंत कमी झाले आहे. तर हरभऱ्याचे सरासरी 13 लाख सात हजार हेक्‍टर क्षेत्र 18 लाख 20 हेक्‍टरपर्यंत वाढले आहे. क्षेत्र वाढतानाच हरभर्याची उत्पादकताही 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यामुळे अन्नधान्य उत्पादनात कडधान्यांचा वाटा वाढला आहे. तुलनेत तेलबियांच्या क्षेत्र आणि उत्पादनात घट आली आहे. रब्बीत कडधान्यांचे 17 लाख 27 हजार टन तर तेलबियांचे एक लाख आठ हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

- क्षेत्रातील घट कायम
गेल्या काही वर्षात हरभरा वगळता उर्वरीत रब्बी पिकांच्या क्षेत्रात सातत्याने घट सुरु आहे. सलगच्या दुष्काळांनी यात अधिकच भर पडली. मात्र गेल्या हंगामात पाऊस कमी पडूनही ही घट कायम राहीली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत एकूण तृणधान्य क्षेत्रात आठ लाख हेक्‍टरने, ज्वारीच्या क्षेत्रात 27 टक्‍क्‍यांनी, गहू 7 टक्‍क्‍यांनी, तीळ 30 टक्‍क्‍यांनी, करडई 50 टक्‍क्‍यांनी, सुर्यफुल 80 टक्‍क्‍यांनी तर जवस 38 टक्‍क्‍यांनी घटले. या घटीचे प्रतिबिंब या पिकांच्या उत्पादनातही उमटले आहे. या पिकांच्या उत्पादनात दोन ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज आहे.

- आलेख रबी उत्पादनाचा
पिके --- सरासरी (लाख टन) --- 2012-13 (लाख टन) --- 2013-14 (लाख टन)
तृणधान्य --- 44.26 --- 23.46 --- 39.86
कडधान्य --- 11.01 --- 9.11 --- 17.27
अन्नधान्य --- 55.27 --- 32.57 --- 57.13
तेलबिया --- 2.45 --- 0.87 --- 1.08

- रब्बीचा पिकनिहाय उत्पादन अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र (लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
ज्वारी --- 22.44 --- 17.85 --- 795
गहू --- 10.97 --- 16.69 --- 1522
मका --- 2.26 --- 5.30 --- 2339
हरभरा --- 18.20 --- 16.71 --- 918
तिळ --- 0.02 --- 0.006 --- 268
करडई --- 1.07 --- 0.72 --- 677
सुर्यफुल --- 0.35 --- 0.24 --- 682
जवस --- 0.31 --- 0.08 --- 245
मोहरी व इतर --- 0.10 --- 0.04 --- 344
---------------(समाप्त)-----------------

No comments:

Post a Comment