Tuesday, April 15, 2014

अंदाज उत्पादनाचा - भाग 3

उन्हाळी हंगाम सरासरीएवढा

पुणे (प्रतिनिधी) ः खरीप व रब्बी हंगामाच्या तुलनेत अत्यंत नगण्य क्षेत्र असलेल्या उन्हाळी हंगामात जेमतेम सरासरीएवढे उत्पादन मिळण्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अंदाज व्यक्त करताना पेरणी किती होईल तर सरासरीएवढी, उत्पादन किती येईल तर सरासरीएवढे असा ढोबळ ठोकताळा कृषी विभागाने मांडला आहे. प्रत्यक्षात अंदाज व्यक्त करण्याआधी सरासरीहून 10 टक्के जास्त पेरणी झाल्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कृषी विभागाने खरीप व रब्बी उत्पादनाबरोबरच संभाव्य उन्हाळी हंगाम उत्पादनाचा अहवालही केंद्राला नुकताच सादर केला आहे. यात तेलबियांची 91 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊन एक लाख 28 हजार टन उत्पादन तर तृणधान्याची 48 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊन 95 हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात उन्हाळी पिकांखालील सरासरी एक लाख 38 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जेमतेम 75 हजार हेक्‍टरवर पेरणी होऊ शकली होती. यामुळे कृषी विभागाने यंदा सरासरीएवढ्या क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त करत त्यानुसार उत्पादनाचाही अंदाज व्यक्त केला आहे.

प्रत्यक्षात यंदा आत्तापर्यंत एक लाख 51 हजार हेक्‍टरवर (110 टक्के) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाजापेक्षा 13 हजार हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी अधिक झाली आहे. यामुळे उत्पादनाचा अंदाज बरोबर येण्याची शक्‍यता अधिक वाढली आहे. राज्यात चालू उन्हाळी हंगामात आत्तापर्यंत भाताची 45 हजार हेक्‍टर, मक्‍याची 22 हजार हेक्‍टर तर भुईमुगाची 72 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पिकांची वाढ चांगली आहे.

- उन्हाळी पिकनिहाय उत्पादन अंदाज (2013-14)
पिक --- क्षेत्र --- उत्पादन --- उत्पादकता
भुईमुग --- 0.81 --- 1.19 --- 1471
सुर्यफुल --- 0.06 --- 0.08 --- 890
भात --- 0.31 --- 0.70 --- 2288
मका --- 0.17 --- 0.25 --- 1450

- अंतिम आकडेवारीला अवकाश
कृषी विभागाने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामांच्या उत्पादनाचे व्यक्त केलेले हे अंदाज अंतिम नाहीत. अंतिम आकडेवारीत खरिप व रब्बीच्या अंदाजात पाच ते दहा टक्के तर उन्हाळी उत्पादनाच्या आकडेवारीत त्याहून अधिक बदल होण्याची शक्‍यता आहे. खरिपाच्या उत्पन्नाची अंतिम आकडेवारी येत्या जूनपर्यंत, रब्बी उत्पादनाची अंतिम आकडेवारी डिसेंबर 2014 पर्यंत तर उन्हाळी उत्पादनाची अंतिम आकडेवारी पुढच्या वर्षीच्या सुरवातीला निश्‍चित होईल, असे कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभागामार्फत सांगण्यात आले.

- आलेख एकूण वार्षिक उत्पादनाचा (लाख टनात)
पिके --- 2013-14 (अंदाज) --- 2012-13 --- सरासरी (06-07 ते 10-11)
तृणधान्य --- 117.37 --- 88.60 --- 110.60
कडधान्य --- 31.84 --- 23.60 --- 24.90
अन्नधान्य --- 149.21 --- 112.20 --- 135.50
तेलबिया --- 52.94 --- 51.05 --- 37.98
-------------(समाप्त)--------------

No comments:

Post a Comment