Monday, April 7, 2014

कृषी विभागात आता बदल्यांचा हंगाम !

487 अधिकारी बदलीस पात्र; शेकडो कृषी सहायकही प्रतिक्षेत

पुणे (प्रतिनिधी) ः राज्य कृषी विभागात सालाबादप्रमाणे या ही वर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच खरिपपूर्व बदल्यांचा हंगाम सुरु झाला आहे. कृषी आयुक्तालयाने एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ काम करत असलेल्या 487 वरिष्ठ अधिकार्यांची माहिती राज्य शासनाला सादर केली आहे. यात 31 "अ' वर्ग तर 456 "ब' वर्ग अधिकार्यांचा समावेश आहे. येत्या 31 मे पर्यंत या बदल्या होणार आहेत. यातील अनेक अधिकारी स्वजिल्ह्यात किंवा "सोई'च्या ठिकाणी गेली अनेक वर्षे मुक्काम ठोकून आहेत.

कृषी आयुक्तालयाने बदलीपात्र अधिकार्यांची सविस्तर माहिती राज्य शासनास सादर केली आहे. ही सर्व माहीती कृषी विभागाच्या संकेतस्थळावरही हरकती वा सुचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात एकाच पदावर तीन चे पाच वर्षे काम करत असलेल्या अधिकार्यांचा समावेश आहे. राज्यात मे अखेरपर्यंत संचालक वा सहसंचालक दर्जाचा एकही अधिकारी बदलीस पात्र नाही. महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पात (एमएसीपी) प्रतिनियुक्तीने पुण्यात कार्यरत असलेले अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय तांभाळे, बीडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांसह सहा अधिक्षक कृषी अधिकार्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. कृषी उपसंचालकपदी कार्यरत असलेले 25 अधिकारी बदलीस पात्र आहेत. यात संगिता माने, अर्जुन पऱ्हाड, दत्तात्रय राजपुरे, सुरेश मगदुम, शरद दोरगे आदींचा समावेश आहे.

- कृषी सहायकांच्याही होणार बदल्या
वरिष्ठ अधिकार्यांबरोबरच राज्यभरातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, अनुरेखक व वाहन चालकांच्याही बदल्याही प्रस्तावित आहेत. या सर्व बदल्या विभागिय कृषी सहसंचालक कार्यालय स्तरावरुन होणार आहेत. विभागाअंतर्गत गाव, मंडळ, तालुका किंवा जिल्हा स्तरावर या बदल्या होतील. विभागनिहाय बदलीपात्र कर्मचार्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्तालयामार्फत सर्व विभागिय कार्यालयांना बदलीपात्र कर्मचार्यांच्या याद्या संकेतस्तळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप फक्त कोल्हापूर विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या विभागात 252 कर्मचारी बदलीपात्र असून त्यात 190 कृषी सहायकांचा समावेश आहे.

- चौकट
बदली नाकारलेल्यांची फेरबदली ?
परतूर (जालना) येथिल उपविभागिय कृषी अधिकार पंडीत बरदाळे यांची सात फेब्रुवारी 2014 रोजी बुलडाणा येथे कृषी उपसंचालक पदी बदली करण्यात आली. परतूर येथून बदली व कार्यमुक्त होऊन सुमारे दोन महिने होऊनही अद्याप ते बुलडाणा येथे रुजू झालेले नाहीत. आयुक्तालयाने त्यांना हजर होण्याची नोटीस पाठवली होती. त्यानंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता पुन्हा एकदा बरदाळे यांच्या बदलीचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. बदलीचे ठिकाण सोईचे नसेल तर रुजू होऊ नका आणि पुन्हा हवी तेथे फेरबदली करुन घ्या... असा पायंडा कृषी विभागात पडत असल्याचे चित्र आहे.
---------------
1 एप्रिल १४, पुणे

No comments:

Post a Comment