Thursday, April 10, 2014

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः मराठवाडा, विदर्भात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिण अरबी समुद्रातील चक्राकार वारे कायम आहेत. या दोन्ही हवामान स्थितींच्या प्रभावामुळे राज्यातील ढगाळ हवामान कायम असून हवामान खात्याने शनिवारी सकाळपर्यंत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात कोठेही गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला नाही.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. नागपूर, नांदेड, उस्मानाबाद व सांगलीत प्रत्येकी एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. परभणीत सर्वाधिक तीन मिलीमिटर पाऊस नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार विजा चमकल्या. विदर्भात कमाल तापमानात सरासरीहून किंचीत घट झाली. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सर्वाधिक 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान होता.

दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीहून 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे कर्नाटकच्या किनारी भागाकडे सरकले आहेत. याच वेळी मराठवाडा व विदर्भावर समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामान आहे. किमान येत्या शनिवारपर्यत हे ढगाळ हवामान कायम राहण्यार असल्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 32.1, अलिबाग 32.6, रत्नागिरी 31.7, पणजी 33.6, डहाणू 32.4, भिरा 39.5, पुणे 37, नगर 39, जळगाव 39, कोल्हापूर 36, महाबळेश्‍वर 31, मालेगाव 40.4, नाशिक 35.9, सांगली 36.2, सातारा 38, सोलापूर 40, उस्मानाबाद 37, औरंगाबाद 37, परभणी 38.4, नांदेड 38.5, बीड 38.8, अकोला 39.6, अमरावती 38.4, बुलडाणा 36.5, ब्रम्हपुरी 40.1, चंद्रपूर 36.8, नागपूर 38.1, वाशिम 38, वर्धा 40, यवतमाळ 38.4
------------------(समाप्त)------------------

No comments:

Post a Comment