Wednesday, April 16, 2014

मराठवाडा पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर

पाणीसाठा 30 टक्‍क्‍यांवर; दोन महिन्यांचे आव्हाण

पुणे (प्रतिनिधी) ः कोकण, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगला पाणीसाठा शिल्लक असताना भूजलापाठोपाठ भुपृष्ठावरील जलसाठ्यांनाही ओहोटी लागल्याने मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे पुन्हा एकदा टंचाईच्या उंबरठ्यावर उभे राहीले आहेत. जायकवाडीसह मराठवाड्यातील अनेक धरणांच्या साठ्यात वेगाने घट सुरु असून पुढील दोन महिने पाणी कसे पुरवायचे हा प्रश्‍न आ वासून उभा राहीला आहे. त्यातल्या त्यात मे महिना अधिक भिषण जाण्याचा धोका आहे.

जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठ्याच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सात एप्रिलपर्यंत 41 टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. नागपूर विभागात सर्वाधिक 51 टक्के, अमरावती विभागात 45 टक्के, कोकणात 44 टक्के, पुण्यात 42 टक्के तर नाशिकमध्ये 40 टक्के जलसाठा शिल्लक आहे. याउलट मराठवाड्यात मात्र जलसाठ्यात वेगाने घट सुरु असून तेथे अवघा 32 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या वेळी आठ टक्के साठा शिल्लक होता. उर्वरीत विभागांमध्ये जलसाठ्यांची गेल्या तीन वर्षातील सर्वात चांगली स्थिती असताना मराठवाड्यात मात्र जलसाठे कोरडे पडण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी चांगला पाणीसाठा असलेल्या मांजरा व इतर धरणांच्या साठ्यात यंदा चिंताजनक घट झाली आहे.

उत्तर मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली नाशिक जिल्ह्यातील धरणेही उपयुक्त पाणीसाठ्याच्या दृष्टीने वेगाने रिकामी होत असल्याचे चित्र आहे. भंडारदरा, गंगापूर, दारणा, करंजवण, मुळा व चणकापूर धरणांचा अपवाद वगळता नाशिकमधील उर्वरीत सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. यामुळे मराठवाड्यापाठोपाठ नाशिक व खानदेश विभागातही टंचाई वाढण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत मांजरा (बीड), निम्न तेरणा, सिना गोळेगाव (उस्मानाबाद), बाघ कालिसरार (भंडारा), लोणावळा (पुणे), वैतरणा (ठाणे), कडवा (नाशिक), निळवंडे (नगर) ही मोठी धरणे उपयुक्त पाणीसाठ्याच्या दृष्टीने कोरडी पडली आहेत. तर जायकवाडी (औरंगाबाद), पोथरा (वर्धा), पालखेड, तिसगाव, पुणेगाव, गिरणा (नाशिक), पिंपळगाव जोगे, टेमघर (पुणे) व धोम बलकवडी (सातारा) या धरणांमध्ये अवघा पाच ते 15 टक्‍क्‍यांच्या आसपास उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.

- जलसंपन्न धरणे
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार सुर्या कवडास (ठाणे) व गोसी खुर्द (भंडारा) ही दोन धरणे सद्यस्थितीत 100 टक्के भरलेली आहेत. यातील सुर्या कवडासमध्ये 10 दशलक्ष घनमिटर तर गोसीमध्ये 300 दशलक्ष घनमिटर साठा आहे. याशिवाय ठाण्यातील सुर्या धामणी (66 टक्के), परभणीतील पूर्णा येलरी (60 टक्के), नांदेडमधील उर्ध्व पेनगंगा (66 टक्के), नागपूरमधील कामठी खैरी (78 टक्के), पेंच रामटेक (65 टक्के), बाघ शिरपूर (62 टक्के), यवतमाळमधील बेंबळा (67 टक्के), बुलडाण्यातील वाण (70 टक्के), रवड (68 टक्के), नाशिकमधील गंगापूर (72 टक्के), जळगावमधील हातनूर (86 टक्के) व वाघूर (83 टक्के) या धरणांमध्ये चांगला भरिव जलसाठा शिल्लक आहे.

- मुंबईचा पाणीसाठी निचांकी पातळीवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांच्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीएवढीच निचांकी घट झाली आहे. गेल्या पाच सहा वर्षातील ही निचांकी पातळी आहे. सर्वसाधारणपणे या वेळी या तलावांमध्ये 90 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक असतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त असलेले वैतरणा धरण कोरडे पडले आहे. पाठोपाठ तानसामध्ये 39 टक्के, मोडकसागरमध्ये 23 टक्के, विहारमध्ये 32 टक्के तर तुळशीमध्ये 50 टक्के पाणी शिल्लक राहीले आहे. साठ्याचा विचार करता मुंबईसाठी आता फक्त 100 दशलक्ष घनमिटर पाणी शिल्लक आहे.

- विभागनिहाय जलसाठा
विभाग --- धरणे --- उपयुक्त साठा (द.ल.घ.मी.) --- टक्के
कोकण --- 158 --- 718 --- 44
पुणे --- 368 --- 4319 --- 42
नाशिक --- 350 --- 1882 --- 40
मराठवाडा --- 804 --- 2454 --- 32
नागपूर --- 366 --- 1995 --- 51
अमरावती --- 379 --- 1310 --- 45
इतर --- 16 --- 2534 --- 41
एकूण --- 2441 --- 15212 --- 41
-------------(समाप्त)------------

No comments:

Post a Comment