Wednesday, April 16, 2014

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला

लोकसभा निवडणूक 2014
-------
19 मतदारसंघात उद्या मतदान

पुणे (प्रतिनिधी) ः देशातील 16 व्या लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 19 लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार मंगळवारी (ता.15) सायंकाळी थंडावला. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, शिर्डी, शिरुर, बारामती, मावळ, पुणे, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये गुरुवारी (ता.17) मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे.

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 10 एप्रिलला विदर्भातील 10 मतदारसंघांत मतदान झाले. त्यानंतर गेली पाच दिवस सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दुसर्या टप्प्यातील मतदारसंघ पिंजून काढले. पंतप्रधानपदाचे दावेदार भाजपचे नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोपिनाथ मुंडे, देवेंद्र फडणविस यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभांमधील आरोप प्रत्यारोप आणि आश्‍वासनांनी मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील हे मतदारसंघ ढवळून निघाले. अगदी शेवटच्या दिवशी आचारसंहीतेच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्हा व तालुका तालुक्‍यात सभा सुरु होत्या.

संबंधीत सर्व जिल्हा प्रशासनामार्फत कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासह मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील 48 पैकी 19 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. विदर्भातील दहा मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान पार पडले असून उर्वरीत 19 मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात 24 एप्रिलला मतदान होणार आहे. या सर्व जागांची मतमोजणी 16 मे रोजी होणार असून मतदानप्रक्रिया 28 मे पर्यंत पूर्ण होणार आहे.

*चौकट
आजची रात्र वैऱ्याची ?
सर्वसाधारणपणे काठावरचे मतदार फिरवण्यासाठी मतदानाच्या आदली रात्र अतिशय महत्वाची समजली जाते. वैयक्तीक भेटीगाठी, घोंगडी बैठका यातून मतदारांना प्रलोभणे दाखवणे, पैसा वा भेटवस्तू वाटप यासारखे गैरप्रकारही या रात्रीच सर्वाधिक घडत असल्याचा पूर्वानुभव आहे. यामुळे आजची रात्र वैऱ्याची रात्र ठरु नये म्हणून बहुतेक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पोलिस प्रशासनानेही हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. वाड्या वस्त्यांवर, गल्ल्या सोसायट्यांवर नजर ठेवण्यापासून पोलिसांच्या दक्षता फेऱ्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
------
*चौकट
- लक्षवेधी लढती
बीड ः गोपिनाथ मुंडे (भाजप), सुरेश धस (राष्ट्रवादी)
नांदेड ः अशोक चव्हाण (कॉंग्रेस), डी.बी.पाटील (भाजप)
हातकणंगले ः राजु शेट्टी (स्वाभीमानी शेतकरी संघटना), रघुनाथदादा पाटील (आप), कलप्पा आवाडे (कॉंग्रेस)
माढा ः विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (स्वाभीमानी शेतकरी संघटना)
शिरुर ः शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना), देवदत्त निकम (राष्ट्रवादी)
सातारा ः उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), राजेंद्र चोरगे (आप), अशोक गायकवाड (महायुती)
नगर ः राजीव राजळे (राष्ट्रवादी), दिलीप गांधी (भाजप)
पुणे ः विश्‍वजित कदम (कॉंग्रेस), अनिल शिरोळे (भाजप), दीपक पायगुडे (मनसे)
--------------

No comments:

Post a Comment