Tuesday, September 16, 2014

दुग्धविकास विभागाच्या मनुष्यबळात निम्म्याने कपात

- सुधारीत आकृतीबंधाची अंमलबजावणी सुरु
- अतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेणार

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागास गेल्या दहा वर्षापासून लागलेली ओहोळी अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. घटलेले दुध संकलन व बंद पडलेल्या गोशाळांपाठोपाठ आता राज्य शासनाने या विभागाच्या मनुष्यबळात तब्बल निम्म्याने कपात केली असून चार हजार 97 पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्‍चित केला आहे.

दुग्धव्यवसाय विकास विभागाला 2003 पुर्वी 13 हजार 501 पदे मंजूर होती. मात्र शासकीय दुग्धशाळा, शितकरण केंद्राचे घटते काम, बंद पडलेल्या गोशाळा यामुळे शासनाने 2003 ला सुमारे सव्वा पाच हजार पदे कमी करण्यात आली. पाठोपाठ आठ वर्षाहून अधिक वापर झालेली जड वाहने उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेतून काढून टाकण्यात आली. यामुळे विभागाच्या पदांमध्ये आणखी कपात होऊन ती आठ हजार 542 झाली. आता यापैकी चार हजार 445 पदे कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय सचिव समितीच्या जुलै 2014 मध्ये झालेल्या बैठकीत दुग्ध विकास विभागाची पदे कमी करुन चार हजार 97 पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्‍चित केला. राज्य शासनाने त्यास मान्यता देत अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या सहा महिन्यात इतरत्र ठिकाणी रिक्त असलेल्या समकक्ष पदांवर सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.

सुधारीत आकृतीबंधातील तीन हजार 958 पदे थेट दुग्धव्यवसाय विभागाची तर उर्वरीत पदांपैकी 73 पदे सहकार विभागाची, 43 पदे वित्त विभागाची, 14 पदे सार्वजनिक आरोग्य विभागाची, चार पदे नियोजन विभागाची, चार पदे महसूल विभागाची तर एक पद कामगार विभागाचे आहे. ही पदे संबंधीत विभागामार्फत प्रतिनियुक्तीने भरली जातात.

- 832 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न
सुधारीत आकृतीबंध आणि कार्यरत कर्मचारी यांची संख्या पाहता सद्यस्थितीत तब्बल 832 ड वर्ग कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर वर्ग करण्याची कार्यवाही यापुढील काळात करण्यात येणार आहे. आकृतीबंधानुसार सध्या दुग्ध व्यवसाय विकास खात्यात 40 अ वर्ग अधिकारी, 35 ब वर्ग अधिकारी आणि 144 क वर्ग कर्मचारी पदे रिक्त आहेत.

*चौकट
- असा आहे सुधारीत आकृतीबंध
गट --- सध्याचा आकृतीबंध --- सुधारीत आकृतीबंध -- कार्यरत कर्मचारी
गट अ --- 128 --- 93 --- 53
गट ब --- 216 --- 148 --- 113
गट क --- 3918 --- 2180 --- 2036
गट ड --- 4280 --- 1676 --- 2508
--------------- 

No comments:

Post a Comment