Monday, September 1, 2014

जुन्या अन्न प्रक्रिया उद्योगांना मिळणार आधुनिकीकरण अनुदान

पुणे (प्रतिनिधी) ः अन्न प्रक्रीया उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेत प्रस्ताव दाखल केलेल्या उद्योगांना राष्ट्रीय अन्न प्रकिया अभियानातून अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग विभागाने घेतला आहे. यासाठी सहा फेब्रुवारी 2009 पर्यंत प्रस्ताव दाखल केलेले धान्य भरडणी उद्योग व 31 मार्च 2012 पर्यंत प्रस्ताव दाखल केलेले इतर अन्न प्रक्रिया उद्योग पात्र ठरविण्यात आले आहेत.

धान्य भरडणी (पिठ, तेल, डाळ व भात) उद्योग क्षेत्रासाठी अन्न प्रक्रीया उद्योग आधुनुकीकरण, तंत्रज्ञान सुधारणा योजनेचा लाभ देणे सहा फेब्रुवारी 2009 पासून बंद करण्यात आले आहे. सध्या बेकरी उत्पादने, ग्राहक उद्योग, खोल समुद्रातील मासेमारी व मत्स्य प्रक्रिया, फळे व भाजीपाला, मांस व पोल्ट्री, दुध व दुग्धजन्य उत्पादने, वाईन व बिअर या प्रक्रिया उद्योगांना सध्या या योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. सर्वसाधारण क्षेत्रात प्रकल्प व यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 लाख रुपये व डोंगरी भागात (डिफिकल्ट एरीया) 33.33 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 लाख रुपये अनुदान मर्यादा आहे.

देशात नवव्या पंचवार्षिक योजनेपासून 11 व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी टेक्‍नॉलॉजी अपग्रेडेशन, मॉडर्नायझेशन ऑफ फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज ही योजना राबविण्यात येत होती. या कालखंडात योजनेच्या लाभासाठी उद्योग व बॅंकांमार्फत मंत्रालयाकडे अनेक प्रस्ताव दाखल झाले आहे. मात्र एक एप्रिल 2013 पासून सुरु झालेल्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान राबविण्यास सुरवात झाली. यामुळे या जुन्या प्रस्तावांना अनुदानाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता अन्न मंत्रालयाने निश्‍चित केलेल्या अंतिम मुदत कालावधी व्यतिरिक्तचे प्रस्ताव फेटाळण्यात येणार आहेत.
------------- 

No comments:

Post a Comment