Wednesday, September 3, 2014

जलसंधारण सुकाणू समितीत पोपटराव पवार यांची निवड

पुणे ः केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय जलसंधारण सुकाणू समितीत जलसंधारण तज्ज्ञ म्हणून आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची निवड झाली आहे. तरुण भारत संघाचे राजेंद्र सिंह राणा, चिपको आंदोलनाचे प्रणेचे चंडीप्रसाद भट्ट, सुरेश खानापूरकर, माधव कोटस्थाने यांचाही या समितीत समावेश आहे.

राष्ट्रीय एकात्मिक पाणलोट विकासासाठी (आयडब्लूएमपी) ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा वर्षाचा अर्थसंकल्प 20 हजार कोटी रुपयांचा असून मृद व जलसंधारणातून पडीक जमिनी उत्पादनक्षम करणे आणि गावे जलसमृद्ध करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामसभा हा या योजनेचा आत्मा आहे. श्री. पवार यांनी सरपंच म्हणून हिवरेबाजारमध्ये केलेल्या कामाचा उपयोग शासन, ग्रामसभा, पंचायत व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी होईल. त्यातून ग्राम परिवर्तनाला नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास सुकाणू समितीचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केल्याचे आदर्शगाव योजनेमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
------------ 

No comments:

Post a Comment