Tuesday, September 30, 2014

स्वबळाने राजकीय पक्षांचे विस्तारणार पंख

कार्यकर्त्यांची कोंडी फुटली; राज्यभर घुमतेय बदलाचे वारे

पुणे (प्रतिनिधी) ः सत्तेच्या सोपानासाठी एकमेकाच्या पायात अडकवून घेतलेल्या बेड्या स्वहस्ते, स्वमुखाने तोडल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. अवघ्या चार आठ दिवसात राज्यभर नव्या नेतृत्वाबरोबरच कार्यकर्त्यांचे पिकही जोमदार आले आहे. यामुळे विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणूकांचीही रंगत वाढणार आहे. पक्षबदलाबदलीचा धुराळा पुढील आठ दिवसात खाली बसून त्यापुढील काळात सर्वच पक्षांच्या हाडाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा चांगले दिवस येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 15-20 वर्षात युती आणि आघाडीचे राजकारण करताना बहुतेक सर्वांचेच पक्ष विस्ताराकडे दुर्लक्ष झाले. यामुळे भाजपा वगळता कोणत्याही पक्षाला आपल्या तथाकथित मित्रपक्षाच्या बालेकिल्ल्यात हात पाय पसरता आलेले नाही. काही ठिकाणी पक्षांची आचारसंहिता झुगारुन वेळोवेळी बंडखोरीही झाली. मात्र तिचे स्वरुप आणि परिणाम मर्यादीत राहीले. दर वेळी तुटेपर्यंत ताणायचे आणि मग ऐनवेळी जुळवून घ्यायचे हे पक्षश्रेष्ठींचे धोरण सामान्य कार्यकर्त्यांच्या मुळावर आले. यामुळे कधी काळी राज्याचा कानाकोपरा दुमदुमवणाऱ्या पक्षांनाही यंदा उमेदवार शोधावे लागले आणि अनेकांना दादा बाबा करत उमेदवारी गळी उतरावी लागली.

आता एकला चलो रे... च्या भुमिकेमुळे पक्षांशी संबंधीत शाखा, संस्था, संघ यांना नवी उभारी मिळून त्यांचे पुनरुज्जीवन होण्यास चालना मिळणार आहे. गेल्या आठ दिवसात या दिशेने वेगाने चक्रे फिरुन ठिकठिकाणी पक्षांच्या यापूर्वी बंद पडलेल्या शाखा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. मोट बांधणी सुरु असली तरी मरगळ झटकली गेली आहे. निवडणूकीनंतर पुन्हा युती झाली किंवा न झाली तरीही पुढची काही वर्षे या शाखा, संस्था, संघटनांमार्फत पक्ष विस्ताराच्या कामाला गती मिळणार हे निश्‍चित. यातून हे पक्ष अधिक उपक्रमशिल होण्याचा सकारात्मक बदलही राज्यभर दिसल्यास नवल नाही.

विधानसभा निवडणूकीतील समिकरणांची जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, बाजार समित्या, सहकारी संस्थांच्या निवडणूकीत पुनरावृत्ती होते असा पायंडा आहे. या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील निवडणूकांमध्येही सर्वच पक्षांच्या युवा नेतृत्वांना मोठ्या प्रमाणात संधी राहणार आहेत. यामुळे पक्षांना विधायक उपक्रमांची घडी बसवणे अपरिहार्य होणार आहे. निवडणूकीच्या धामधुमितही याची दखल पक्षांना संघटनात्मक बांधणी करता घ्यावी लागणार आहे, हे निश्‍चित.

निवडणूकीनंतर सत्तास्थापनेसाठी युती, आघाडी होणे वेगळे आणि निवडणूकीआधीच युती, आघाडी करुन मतदारांसमोर जाणे यात मोठा मुलभूत फरक आहे. निवडणूकीनंतरची आघाडी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या थेट मुळावर येत नाही. पण निवडणूकीआधीच्या युतीने थेट सामान्य कार्यकर्त्यांच्या पायावर कुऱ्हाड पडते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी वेगळे होऊन पुन्हा युती झाली त्या वर्षी दोन्ही पक्षांच्या उभ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा संघर्ष पाहिला, सहन केला आहे. पुणे शहरातील कार्यकर्त्यांचे तर ते नेहमीचेच दुखणे झाले होते.

निवडणूकीआधी युती, महायुती व आघाडी करण्याच्या धोरणामुळे सत्तेचा सोपान दृष्टीक्षेत्रात येत असता तरी कार्यकर्त्यांच्या पायावर कुर्हाड कोसळते व नवीन कार्यकर्ते जन्माला येण्याची प्रक्रीयाही खंडीत होते. नेमक्‍या याच कारणामुळे गेल्या काही वर्षात राजकारणापासून अलिप्त असलेल्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याच वेळी जुन्या कार्यकर्तेही मुख्य प्रवाहातून बाजूला झाले. आता एकला चलो रे मुळे अनेकांनी पुन्हा मुख्य प्रवाहात येत बाशींग बांधले आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील राजकारणाचा गेल्या 25 वर्षांचा कालावधी युती, आघाडी, तडजोडीच्या राजकारणाचा राहीला. आता पुढील 25 नाही तर किमान 5-10 वर्षांच्या राजकारणाची दिशा पुढील 15 दिवसात ठरणार हे मात्र निश्‍चित.
---------------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment