Tuesday, September 30, 2014

मंचरच्या घुल्यांचं "आनंदी गोकुळ'

सख्खं, चुलत असं काहीही वातावरण नाही. उलट एखाद्याने हा तुमचा चुलत भाऊ का, असं विचारलं तरी वाईट वाटतं, असं वातावरण आहे. पुढच्या पिढ्यांनाही ती ओढ, तो पिळ कायम आहे. सर्वांना गावची, घरची ओढ कायम आहे. थोडाही वेळ भेटला की सगळ्यांचे पाय गावाकडे धाव घेतात. नातवंडांना कधी सुट्टी लागते आणि आम्ही गावाला जातो असं होतं. गणपती, दिवाळी, मे महिना, यात्रा, भाऊबीजेला आत्यांच्या, मामांच्या मुलामुलींसह सर्वांनी घर भरलेलं, गजबजलेलं असतं. सुट्टी संपल्यावर पुन्हा नोकरीवर, कामावर जायला निघतात तेव्हा घर सोडताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं.
..............
- संतोष डुकरे
..............
स्वातंत्र्यपूर्व काळ. महात्मा गांधींनी इंग्रजांसाठी "चले जाव'ची घोषणा दिलेली. जुन्नर, आंबेगाव, खेड स्वातंत्र्य चळवळीने ढवळून निघालेले. उत्तरोत्तर स्वातंत्र्यलढ्याचा कैफ वाढत चाललेला. या देशप्रेमानं भारलेल्या वातावरणात मंचरमध्ये लक्ष्मण मनाजी घुले यांच्या उंबऱ्यावरचं माप ओलांडून पार्वतीबाई थोरली सून म्हणून घरात आल्या. माहेरचं लाडाचं नाव ताई माहेरीही कायम राहिलं. वय जेमतेम 15 वर्षांचं. सासरची परिस्थिती बेताची. अवघी 30 गुंठे शेती आणि दोन खणाचं एक कौलारु घर. लक्ष्मणराव मुंबई मार्केटला मोसंबीचा व्यापार करत होते. पण धंद्यात फार काही बरकत नव्हती. त्यात दम्याचा त्रास. संसाराचा गाडा कसाबसा जेमतेम चाललेला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दोन मुलं पदरात होती. मोठी शारदा (आक्का) आणि लहानगा शांताराम (आबा). लक्ष्मणरावांचा दमा बळावल्यावर ताईनं मंचरला परतण्याचा निर्णय घेतला.

ंघुले कुटुंबीय मंचरला आले, पण संसार चालविण्याचा झगडा कायम होता. कोथिंबीर (धना) बाजारात बाजारहाट करुन ताई घर चालवत होती. तशात मुलं मोठी होऊ लागली, वाढूही लागली. शारदा तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिकली. शांताराम हुशार होता. त्याला शिकवायची जिद्द ताईनं मनात धरून जिवाचं रान करुन राबत होती. तशातच तीन मुलगे आणि तीन मुली पदरात असताना लक्ष्मणरावांचं निधन झालं. संकटं अधिक बिकट झाली. शारदा शाळा सोडून ताईच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागली. तशाही परिस्थितीत ताईला काळीज सुपाएवढं करून होती नव्हती ती 30 गुंठे जमीनही गहाण टाकावी लागली. शांतारामला पुण्याला शाळेत घातलं. मंचरचाच हरिभाऊ मोरडे बरोबर होता. दोघांचा जेवणाचा डबा दररोज एसटीने मंचरहून पुण्याला जायचा. दोघांचीही घरची परिस्थिती अशी की भाजी भाकरी दोन्ही देणे अशक्‍यच. मग आलटून पालटून एक दिवस एकाचं कालवण आणि दुसऱ्याची भाकरी, अशा पद्धतीने दोन्ही घरुन डबा दिला जायचा. आपल्यासाठी आई, बहिण राब राब राबताहेत, सर्व जमीन गहाण पडलीये याचा फार मोठा सकारात्मक परिणाम शांतारामवर झाला. लहान वयातच जबाबदारीचं भान आलं आणि मग तोही भान हरपून "कमवा आणि शिका'चा मार्ग अवलंबून शिक्षणाला झोंबला.

शांतारामांनी स्वतः शिकता शिकता एका कंपनीत अर्धवेळ नोकरी सुरू केली. त्यातून आलेल्या पैशावर स्वतः शिकले व पाठीवरची चारही भावंडं शिकवली. जबाबदारी पार पाडता पाडता शांताराम सगळ्यांचा आबा झाला. मोठ्या भावाच्या भूमिकेतून पितृत्वाच्या भूमिकेत हे त्यांचे त्यांच्याही नकळत परिस्थितीने केलेले रुपांतर होते. आबांनी बी कॉम पूर्ण करुन आयआरएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आबांच्या जिवावर पुढं सगळे भाऊ, बहिणी शिकले. लग्नं झाली. आक्का (कै. शारदा) शिवणराम करुन हातभार लावत होती. ताईचाही हात राबता होता. आक्काचं शिक्षण मध्येच सुटलं तरी तिनं वाचनाची, लिखाण टिपणाची आवड जोपासली. आक्काचा विवाह अल्पकाळाचा ठरला. पदरात एक मुलगी घेवून तिनं माहेर जवळ केलं. या भाचीला (पिंकी) आबांनी दत्तक घेतलं.

आबांच्या पाठच्या वसंतरावांनी 10 वी नंतर कुटुंबाची गरज ओळखून कोल्हापूरच्या महापालिकेत नोकरी पकडली. पुढे ते मुंबई महानगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्‍टर म्हणून रुजू झाले. वसंतरावांच्या पाठच्या इंदूताईने 10 वी पर्यतचे शिक्षण पूर्ण करुन कुटुंबाला हातभार लावला. त्यांचा मंचरमधीलच शिवाजीराव बढे यांच्याशी विवाह झाला. सर्वात लहान भाऊ अशोक याने मुंबईतील सोमय्या कॉलेजमधून बी कॉम पूर्ण केले. आबांच्या इच्छेनुसार त्याने शेतीचा मार्ग धरला. सर्वांत लहान असलेली आशाताई 12 वी पर्यंत शिकली. सोपानराव थोरात यांच्याशी तिचा विवाह झाला. घरच्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या तरी आबांनी व इतर भावंडांनी त्यांना कधीही अंतर दिलं नाही किंबहुना आज या बहिणी आज्जीच्या भूमिकेत असतानाही त्यांच्या घरचा कोणताही महत्वाचा निर्णय आबांचा सल्ला घेतल्याशिवाय होत नाही, एवढी ही कुटुंब एकमेकांशी एकजीव झाली आहेत.

आबा पुण्यात नोकरी करत होते. दर रविवारी संपूर्ण दिवस शेतावर काढत होते. शिक्षणासाठी सर्व शेती गहाण टाकावी लागली, ही सल त्यांना शांत बसू देत नव्हती. शेवटी त्यांनी मनाचा निर्धार पक्का केला. जेवढी काटकसर करता येईल तेवढी करुन जेवढी रक्कम शिलकीस पडेल तेवढ्याची जमीन घेत राहायची. कुटुंबाला पुरेसी शेतजमीन हवीच, याच जिद्दीतून त्यांना पै ला पै जोडून 1978 साली चार एकर पडीक माळरान जमीन विकत घेतली. ती सुद्धा मंचरपासून 30 किलोमिटर दूर दुष्काळग्रस्त पट्ट्यात. जिथे ना काही पाण्याची सोय ना पुरेसा पाऊस. नंतर जसजशी ऐपत झाली तसतशी दोन दोन, तीन तीन एकर जमीन घेत गेले. यामुळे 1982 सालापर्यंत कुटुंबाची जमीन 13 एकर झाली.

"सासू तशी सून, उंबऱ्या तुझा गुण' या म्हणीप्रमाणे ताईला तिच्या सर्व सुनाही तिच्यासारख्याच कर्तबगार आणि मनमिळावू मिळाल्या. आबांची पत्नी आशालता ही सर्व दिर व नणंदांच्या पाठीमागे आईसारखी उभी राहिली. पडत्या काळात आबांच्या बरोबरीने ती कुटुंबाचा वटवृक्ष झाली. आबांनी स्वतः कस्टम खात्यात नोकरी केली, पण आपल्या भावांनी, मुलांनी नोकरीच्या मागे लागून फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करण्यापेक्षा व्यवसाय करुन अनेक कुटुंबांच्या पोटाची सोय करावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे महापालिकेत असलेल्या वसंतरावांव्यतिरिक्त कुटुंबातील इतर कुणीही सदस्य संधी असूनही नोकरीच्या फंदात पडले नाहीत. आबा सांगतील तसे सगळे ऐकत गेले आणि मग सचोटीच्या अनेक मार्गांने कुटुंब हळू हळू सुदृढ आणि संपन्न होत गेलं.

अशोकचं बी कॉम पूर्ण झाल्यानंतर मुंबई, पुण्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही त्याने कुटुंबाची शेती सांभाळावी अशी इच्छा आबांनी व्यक्त केली. आबांची इच्छा शिरोधार्य मानून अशोकरावांनी एक शब्दही न उच्चारता सर्व संधी अव्हेरून शेतीतच करिअर घडविण्याचा निश्‍चय केला. सौ. अंजली 1982 साली अशोकरावांच्या धर्मपत्नी झाल्या आणि त्यांच्या शेतीची भरभराट सुरु झाली. या जोडीनं एसटी बसही जात नव्हती अशा ठिकाणच्या शेतीवर कुडाच्या झोपडीत मुक्काम ठोकून शेतीत जम बसवला. गावातली पहिली नदीवरुन शेतीसाठीची उपसा सिंचन योजना, पाईपलाईन केली. सुरवातीला भाजीपाल्यावर भर दिला. आजूबाजूच्या भागात अनेक नवनवीन पिकं सर्वप्रथम आणली. तब्बल 10-10 एकरावर टोमॅटोचे उत्पादन घेतले. कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला, मोसंबीच्या बागा फुलवल्या. दुग्ध व्यवसायातही जम बसवला. दररोज 200 लिटरहून अधिक दुग्ध उत्पादन घेतले.

जिल्हा परिषदेचा आदर्श पशुपालक पुरस्कारही त्यांना मिळाला. सौ. अंजली यांनी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणूनही पाच वर्षे बिनविरोध काम पाहिले. हे सर्व शेतात स्वतः काम करता करता. सौ. अंजली यांच्यानंतर अशोकरावांची भिमाशंकर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली. त्यांनी गावात काठापूर दुध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली. गेली 25 वर्षांहून अधिक काळ ते या दुग्ध संस्थेचे बिनविरोध अध्यक्ष आहेत. आज कुटुंबाची शेती 80 एकरहून अधिक विस्तारली आहे. बांधावर नारळाची 125 झाडे, ऊस 16 एकर, सिताफळ 8 एकर, डाळिंब 6 एकर, केळी 3 एकर, आले 3 एकर, इतर पिकांबरोबरच 10-11 जर्सी गाई व कालवडी असा सारा बारदाना विस्तारला आहे. शेतात पिकणारा कांदा, बटाटा, बाजरी, गहू, भुईमुग, भाजीपाला आदी सर्व शेतमाल सगळ्यांना पुरवला जातो. गरजेप्रमाणे फक्त कुटुंबासाठीही भाजीपाला, अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते.

या दांपत्याचा मुलगा प्रशांत बी.एसस्सी (ऍग्री) आणि एम.बी.ए (ऍग्री ऍण्ड फुड बिझनेस) शिक्षण घेवून नोकरीच्या मागे न लागता वडलांप्रमाणेच शेतीतच करिअर घडविण्याचे धेय्य घेवून आज आई वडलांच्या बरोबरीने कुटुंबाच्या संपूर्ण शेतीची जबाबदारी सांभाळत आहे. शेतीसाठी नवे व्हिजन आखून त्याची वाटचाल सुरु आहे. शेती करणाऱ्याला इतर सर्वांनी सांभाळून घ्यायचे, असा या घरचा रिवाजच आहे. अशोकरावांना त्यांच्या सर्व भांवांनी सांभाळून घेतले. आता प्रशांतलाही त्याचे सर्व भाऊ सांभाळून घेतात. शेतीचे एक रुपयाचेही उत्पन्न त्यांच्या खिशात जात नाही. पण आज काय काम चाललंय, पाऊस झाला की नाही, काही अडचण आहे का याची विचारपूस केल्याशिवाय ते राहत नाहीत. गरजेनुसार एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे ही प्रत्येकाचीच सवय बनली आहे. एकमेकांच्या कानावर घातल्याशिवाय कुणीही काही निर्णय घेत नाही. सगळ्यांचे एकमेकांकडे लक्ष असते.

ताई व आबांच्या असामान्य योगदानामुळे आणि अशोकराव व वसंतरावांच्या खंबीरतेने घर उभे राहिले, पुढे आले, यशस्वी झाले. आता पुढच्या पिढ्यांनी कळस चढवला आहे. आबांच्या प्रेरणेने त्यांच्या दोन्ही मुलांनी विवेक व गिरीशने अनुक्रमे बी कॉम व इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीच्या फंदात न पडता व्यवसायाचा मार्ग धरला. आत्तेभाऊ अविनाश व मामा संजय शिवबोटे यांना भागीदार करुन घेत त्यांनी 10 वर्षापुर्वी मुंबईत सनग्रेस इंटरप्रायजेस ही कंपनी सुरु केली. क्‍लिअरिंगच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून तिचा व्याप आता बराच वाढला आहे. पाठोपाठ दोन वर्षांपूर्वी मंचर येथे त्यांनी सनग्रेस इंफ्रा प्रोजेक्‍ट्‌स ही कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातही पदार्पण केले आहे.

गावाकडे राहणाऱ्या कुटुंब सदस्यांनीही फक्त शेती एके शेती करणे चुकीचे आहे. शेती चांगली करता करता इतर व्यवसायही असावेत. फक्त शेतीवर अवलंबून राहू नये, अशी आबांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी दुरदृष्टीने मंचरमध्ये मार्केट झाल्यानंतर पडीक जागेवर बांधकाम केलं आणि त्या ठिकाणी 97-98 मध्ये कुटुंबाच्या तीन फर्म उभ्या राहिल्या. आबांच्या चुलत भावाचा मुलगा अजय व अशोकरावांची पत्नी सौ. अंजली यांना त्यांनी भागिदारीत साई फर्निचर हे छोटं दुकान सुरु करुन दिले. अजयचे वडील (दगडू) त्याच्या लहानपणीच वारले. तेव्हापासून तो घरच्यासारखाच होता. आबांच्या मित्राच्या (लोंढे) मुलीशी (भाग्यश्री) त्याचा विवाह करण्यातही आबांनीच पुढाकार घेतला. अजयने या व्यवसायात जीव ओतला. आज साई फर्निचर हे दुकान उत्तर पुणे जिल्ह्यातील फर्निचरचे सर्वात मोठे दुकान समजले जाते.

अशोकराव व आबांचे मेव्हणे श्री. वाबळे यांनी याच ठिकाणी भागिदारीत आश्‍विनी कलेक्‍शन हे तयार कपड्यांचे दुकान सुरु केले. वर्षागणिक या व्यवसायाची उलाढाल वाढत असून सध्या हे लग्न बस्त्यासाठीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून नावाजले जाते. जवळच बहिणीच्या मुलाला (विशाल) भिमाशंकर हार्डवेअर हे दुकान सुरु करुन दिले. शेती, बांधकाम व्यवसाय आदींसाठी लागणारे सर्व प्रकारचे हार्डवेअर, यंत्रसामग्री या दुकानात उपलब्ध असते. मंचरमधील रोटरी क्‍लबचे आबा संस्थापक अध्यक्ष. त्यांच्यानंतर पुढे अजयनेही "रोटरी'चे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. आबांचा सामाजिक कामाचा वारसा अजय "रोटरी'च्या व साई फर्निचरच्या माध्यमातूनही समर्थपणे चालवत आहे.

सुमारे 40 माणसांचं एकत्र कुटुंब असले तरी घुलेंच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. एकाच छत्राखाली वेगवेगळे व्यवसाय आहेत. सर्व व्यवसायांमध्ये एकमेकांच्या भागीदाऱ्या असून त्यांची जबाबदारी विभागून देण्यात आलेली आहे. काही सदस्य नोकरी करत आहेत. कुणालाच एकमेकांकडून काहीही आर्थिक अपेक्षा नाहीत. मूळ म्हणजे कुटुंबातील सर्व महिला एकत्रितपणे एवढ्या गुण्यागोविंदाने नांदताहेत की कुणाला या जावा जावा आहोत हे सांगितल्यावरही खरं वाटत नाही. एकमेकांतील नाती ही नात्यांपलिकडेही मैत्रीने जोडलेली व जोपासलेली आहेत. ताई, आक्का, आबा व वहिनीने कधीच कुणाला "माझं तुझं' शिकवलं नाही. या सर्वांनी कुटुंबाचा एकजिनसिपणा वाढवला. हेच कुटुंबाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. आत्तापर्यंत जी काही यशस्वी मजल कुटुंबाने मारली ती केवळ या एकत्रितपणामुळेच ही जाणही त्यांच्या ठायी आहे.

नोकरी, व्यवसायानिमित्त घरातील अनेक सदस्य वर्षाचा बराचसा काळ बाहेर असतात. कुटुंबाने त्यांच्यासाठी त्या ठिकाणी सर्व सोयी करुन दिल्या आहेत. सर्व जण एकमेकांना पूरक काम करतात. दर 4-5 महिन्यांनी सणावारानिमित्त सगळे एकत्र येतात. सख्खं, चुलत असं काहीही वातावरण नाही. उलट एखाद्याने हा तुमचा चुलत भाऊ का, असं विचारलं तरी वाईट वाटतं, असं वातावरण आहे. पुढच्या पिढ्यांनाही ती ओढ, तो पिळ कायम आहे. सर्वांना गावची, घरची ओढ कायम आहे. थोडाही वेळ भेटला की सगळ्यांचे पाय गावाकडे धाव घेतात. नातवंडांना कधी सुट्टी लागते आणि आम्ही गावाला जातो असं होतं. मुंबईला गेल्यावर मुंबईसारखं, गावाला आल्यावर गावासारखी होतात. गणपती, दिवाळी, मे महिना, यात्रा, भाऊबीजेला आत्यांच्या, मामांच्या मुलामुलींसह सर्वांनी घर भरलेलं, गजबजलेलं असतं. भविष्यातही विभक्त होण्याचा कुणी विचारही करु शकत नाहीत, एवढं हे बॉंन्डिंग भक्कम आहे. सुट्टी संपल्यावर पुन्हा नोकरीवर, कामावर जायला निघतात तेव्हा घर सोडताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं.

- सर्वांच्या नावावर जमीन
कुटुंबाची सुरवात झाली तेव्हा फक्त 30 गुंठे जमीन होती. ती ही शिक्षणासाठी गहाण पडलेली. यानंतर जसजशी ऐपत होत गेली तशी जमीन खरेदी झाली. मात्र ती खरेदी करताना प्रत्येक वेळी ज्याच्या नावावर जमीन नाही त्याच्या नावाने झाली. यामुळे आज दोन तीन सदस्य सोडले तर घरातील प्रत्येकाच्या नावावर कमी अधिक जमीन आहे. थोडक्‍यात कुटंबाची जमीन एकत्रच आहे. पण "सात-बारा' प्रत्येकाच्या नावाचा आहे. अगदी लग्न होवून गेलेल्या बहिणींच्या, मुलींच्या नावावरही जमीन आहे. "हे माझं, हे तुझं' असं काही नाही. जे आहे ते आपलं आहे ही भावना सर्वांच्या मनात सदासर्वकाळ तेवत असते.

- दगडी बंगला ते शेतातला बंगला
ताईच्या सुरवातीच्या काळात मंचरमध्ये दोन खणाचं कौलारू घर होतं. पुढे कुटुंब कबिला वाढल्यानंतर मंचरमध्येच संपूर्ण दगडात चार खणाचं मोठं घर बांधण्यात आले. हे घर मंचरमध्ये "दगडी बंगला' या नावानं ओळखलं जातं. त्याचं बांधकाम 80-85 ला पूर्ण झालं. एक खण किचन व देवघर आणि तीन खण बेडरुम असे याचे स्वरुप आहे. काही मराठी चित्रपट-मालिकांचे शूटिंगही या बंगल्यात झाले आहे. काठापूरला शेतीत कुडाचं घर होतं. अलिकडे 2012 साली सर्व कुटुंबाला समावून घेवू शकेल एवढा बंगला त्या ठिकाणी बांधण्यात आला. जसजसे पिकांचे पैसे येतील तसतसे 4-5 वर्षे या बंगल्याचे बांधकाम सुरु होते.

- आनंदाचं झाड
ताई आज्जी ही सर्व कुटुंबाला एकजीव करणारा धागा होती. ताईने आयुष्यभर सर्वांवर मायेचं छत्र धरलं. तिचा जन्म 1930 चा. 2006 साली वयाच्या 76 व्या वर्षी ती गेली. अनेक वर्षे बाजार केल्यामुळे सर्व नोंदी ठेवण्याची तिला सवय होती. वाचनाची आवड होती. मुलांची लग्न झाल्यानंतर तिने संसारातले, व्यवहारातले सर्व लक्ष काढून घेतले. नातवंडा- पतवंडांसाठी ती मॉडर्न आज्जी होती. त्यांच्याबरोबर ती चक्क गाण्यांच्या भेंड्या खेळायची, क्रिकेटचे सामने पाहायची. श्रद्धा फक्त विठ्ठलावर...

ताईने सलग 30 वर्षे मंचर ते पंढरपूर पायी वारी केली. पंढरपूरमध्ये उंच बिरोबा मठात त्यांनी एक खोली विकत घेतली होती. शेवटच्या वारीची जाणीव त्यांना आधीच झाली. आपल्या मागेही वारी सुरु राहावी म्हणून शेवटच्या वारीत त्या सुनेला आणि नातवंडांना बरोबर घेऊन गेल्या. पंगत कशी घालायची, वारी कशी चालवायची, हे सर्व त्यांनी सुना नातवंडांना दाखवलं, शिकवलं. ही वारी पार पडल्यानंतर दोनच महिन्यात त्यांचे निधन झाले. ताईंची वारी थांबली आणि सुना नातवंडांची सुरु झाली.

नातवंडांनी आता आजीच्या विठ्ठलाच्या वारीला शिवरायांच्या वारीचीही जोड दिली आहे. प्रशांत व त्याची भावंडांची 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजा, 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवासाठी शिवनेरीला, 14 मे ला शंभू महाराज जयंतीसाठी पुरंदरला तर 6 जूनला राज्याभिषेक दिनासाठी रायगडला वारी सुरु असते.

- आधारवड
आबांनी कुटुंबाच्या प्रगतीचा पाया घातला. त्यांची भूमिका मुख्य मार्गदर्शक आणि पाठीराख्याची. मुलं मोठी झाली, नातवंडं कळती झाली, पण आबांनी पिढ्यांमध्ये अंतर पडू दिलेलं नाहीत. नवे बदल स्वीकारले. एखाद्या बाबीला विरोध सुद्धा ते सकारात्मकपणे करतात. मुलांच्या विचारांचा आदर करुन त्यांना योग्य वळण लावण्यात त्यांचा वाटा महत्वाचा राहिला. आबा फक्त घरच्यांसाठीच नाही तर मित्र परिवार व गरजूंसाठीही आधारवड आहेत. बाहेरच्यांना त्यांचे सल्ले, मदत, मार्गदर्शन कायम सुरु असते. बरं हे करताना त्यांना आपलं नाव नको असतं. त्यामुळे कुणाला मदत केली तरी या कानाचं त्या कानाला कळत नाही. अनेक कुटुंबांना त्यांनी पडत्या काळात आर्थिक मदत केली. अनेक मुलांना पुण्या मुंबईत नोकरी लावण्यासाठी मदत केली. अनेकांनी आबांनी केलेल्या मदतीचे पैसे बुडवले, अनेकांनी फसवलेही. पण त्यांनी कुणाचेच मनावर घेतले नाही. त्यांच्यातील शांतपणा, संयतपणा, साधेपणा कायम राहिला. "श्रीमंती आली तर माजू नये व गरिबी आली तर लाजू नये' ही आबांची विचारसरणी. त्यामुळे संपन्नता येऊनही घरात कुणाचाच दागिणे, पैसा यात जीव नाही. साधी अंगठी घालायलाही कुणाला आवडत नाही.

- चैतन्याचे झरे
घरातील प्रत्येकाचा रोल आपसूक ठरलेला आहे. अशोकराव शेती, व्यवसाय, राजकारण आणि समाजकारण, तर वसंतराव म्हणजे कुटुंबाच्या चैतन्याचा खळाळता झरा. गणपती उत्सावात ते 15 दिवस घरी मुक्काम ठोकून असतात. दिवाळी, मे महिना हा काळ तर खास वसंतरावांचाच. आज 63 व्या वर्षीही सर्व मुलांना, 8-10 नातवंडांबरोबर लहानातले लहान होऊन त्यांची धम्माल दंगामस्ती, खेळ सुरु असतात. घरात आणि प्रत्येक उत्सवात जोश कायम ठेवण्याची, सगळ्यांना खुश ठेवण्याची जबाबदारी ते लिलया पार पाडतात. कुटुंबाचा आनंदीपणा वाढायला व समतोल राखायला यामुळे मोठी मदत होते. शिवाय मुलांमध्ये एकमेकांबद्दलचे बॉंन्डींगही अतूट होते. सर्व भावंडं एकमेकांची सर्वात जवळची मित्रमैत्रिण बनतात. फोटो काढणे हा त्यांचा छंद. त्यातून घरातील लहानमोठ्यांचे तब्बल 300 अल्बम त्यांच्या संग्रही आहेत.

- कुटुंबाचे सण उत्सव
दिवाळी पाडवा, भाऊबीज, गणपती व श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा हे कुटुंबाचे मुख्य सण व उत्सव आहेत. गणपती उत्सव हा कुटुंबाचा मुख्य उत्सव आहे. 1985 पासून घरी गणपती बसवला जातो. हे संपूर्ण 10 दिवस कुटुंबात आनंदोत्सव सुरु असतो. वसंतराव या काळात 12-15 दिवस घरी मुक्काम ठोकून असतात. विसर्जनाच्या दिवशी सर्व कुटुंबीय उपस्थित असतात. दिवाळी पाडव्याला कुटुंबामार्फत मंचरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची काकडआरती केली जाते. यासाठी सर्व कुटुंबीय पहाटे पाच वाजता मंदिरात उपस्थित असतात. भाऊबीजेला आत्या, नणंदा, सुना, जावा आदी सर्व नातीगोती एकत्र येतात. घर गोकुळासारखं भरतं. संध्याकाळी सुना त्यांच्या भावांकडे जातात व माहेरवासीणी माहेरात राहतात. श्री क्षेत्र थापलिंग यात्रेलाही सर्वजण एकत्र येतात. पूर्वी घरचा बैलगाडा होता. तालुक्‍यातील आघाडीच्या नामांकीत बैलगाड्यांमध्ये त्याची गणना होई. बैलगाडा शर्यतींवर बंदी येण्यापूर्वीच त्यांनी बैलगाडा बंद करण्याचा निर्णय घेतला. उत्सव मात्र पूर्वीप्रमाणेच उत्साहात सुरु आहेत.

- प्रेमविवाह स्वीकारले
सर्वसाधारणपणे जुन्या संस्काराची माणसं प्रेमविवाह स्वीकारत नाहीत, त्यास विरोध करतात. घुले कुटुंबीयांनी मात्र नवे प्रवाह आणि मुलांचे हित लक्षात घेऊन त्यास आपलेसे केले आहे. कुटुंबातील आत्तापर्यंत लग्न झालेल्या चार मुलांपैकी तिघांचे प्रेमविवाह झालेले आहे. आबांचा मोठा मुलगा विवेकची पत्नी शिल्पा ही कोकणस्थ मराठा आहे. तर गिरीशची पत्नी तृप्ती ही गुजराथी आहे. वसंतरावांचे ज्येष्ठ चिरंजिव डॉ. अमोल (बीएएमएस) यांच्या पत्नी डॉ. सौ. अर्चना (निकम) या नाशिकच्या आहेत. तर अनिल (केमिकल इंजिनिअर) व सौ. अर्चना (बाणखेले) यांचे लग्न ठरवून झाले आहे. सौ. प्रियंका कॉम्प्युटर इंजिनिअर असून सध्या त्या मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत.

- नीती आणि सचोटी शिरोधार्य
लबाडी, फसवणूक, चुकीच्या, बेकायदेशीर, अनैतिक गोष्टी कधीच कुणी करायच्या नाहीत, हे कुटुंबाचे मुख्य नीतीतत्व आहे. नेकी, इमानदारी, कष्ट आणि ज्ञानाच्या बळावर जे काही मिळवता येईल ते कुटुंबाच्या एकत्रित पाठबळावर मिळवायचे या पद्धतीने कुटुंबाने प्रगती साधली आहे. व्यवसाय करताना नीतिमूल्यांचे काटेकोर पालन केल्याने कुटुंबाचे तालुक्‍यात मोठे गुडविल तयार झाले आहे. तोच विश्‍वास पुढच्या पिढीनेही कायम ठेवलाय. वाढवलाय. लग्न करताना दोन्ही कुटुंबांनी निम्मा निम्मा खर्च करायचा हा शिरस्ता आहे. वसंतरावांच्या अनिलच्या लग्नात मुलीच्या वडीलांनी बाणखेले सरांनी सर्व खर्च केला. ते आबांकडून पैसे घ्यायला तयार नव्हते. पण हे तत्वात बसत नाही. सर्व मुलांचा निम्मा खर्च आम्ही केला मग अनिलचा का नाही अशा भूमिकेने त्यांनी खर्चाची रक्कम सरांना दिली. ही सचोटी सर्व कुटुंबीयांनी सर्वच बाबतीत जोपासली आहे.
------------
संपर्क ः प्रशांत घुले - 9890767695
-----------

No comments:

Post a Comment