Thursday, March 12, 2015

16 मार्चपर्यंत गारपीटीचा अंदाज


पुणे (प्रतिनिधी) ः किमान तापमानात वाढ आणि कमाल तापमानात घट होवून राज्यात चालू आठवडा पावसाळ्यासारखा राहण्याची चिन्हे आहेत. ढगाळ हवामान, दुपारनंतर सोसाट्याचा वारा व पावसाच्या सरी किंवा गारपीट ही गेल्या पाच दिवसांची स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता.16) कोकणेतर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पाकिस्तान व लगतच्या भागात पश्‍चिमी चक्रावात सक्रीय आहे. या चक्रावाताच्या प्रभावामुळे समुद्रसपाटीच्या पातळीवर कमी दाबाच्या पट्‌टा निर्माण झाला आहे. अरबी समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीवर लक्षद्विप बेटांपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर ते थेट गुजरातपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याच्या प्रभावाने समुद्रावरुन राज्यात बाष्पयुक्त ढग दाखल होत आहेत. चक्रावात व हा कमी दाबाचा पट्टा या दोन्हींच्या एकत्रित प्रभावाने राज्यात ठिकठिकाणी गडगडाटी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट सुरु आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या नोंदीनुसार गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात बुलडाणा येथे 20 मिलीमिटर, वर्ध्यात 13, औरंगाबाद व अमरावतीला प्रत्येकी 12, अकोल्यात पाच, नागपूरला तीन तर यवतमाळ व महाबळेश्‍वरला प्रत्येकी दोन मिलीमिटर पाऊस पडला. परभणी व मुंबईत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वाऱ्यांसह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. पणजी येथे सर्वाधिक 36.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान तर महाबळेश्‍वर येथे सर्वात कमी 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ झाली. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर विदर्भाच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 33.8 (25.2), सांताक्रुझ 35.3 (22.9), अलिबाग 32.7 (24.4), रत्नागिरी 36.1 (20.8), डहाणू 32.1 (22.6), पुणे 32.6 (17.5), नगर 34.1 (17.5), जळगाव 35.2 (16.2), कोल्हापूर 33.3 (20.5), महाबळेश्‍वर 26.8 (16), मालेगाव 36.2 (20), नाशिक 33.7 (18), सांगली 34.2 (19.5), सातारा 32.1 (17.4), सोलापूर 35.8 (20), उस्मानाबाद 32.6 (17), औरंगाबाद 33.4 (16), परभणी 33.5 (19.7), नागपूर 35.5 (20.7), वाशिम 32.2 (20.4), वर्धा 35 (20.2), यवतमाळ 32.5 (18)
------------------

No comments:

Post a Comment