Monday, March 2, 2015

हवामानाची ३० वर्षातील दुर्मिळ स्थिती - अवकाळी पाऊस

राज्यातील पावसामागे गेल्या
30 वर्षातली दुर्मिळ स्थिती

हिमालयीन चक्रावाताचा दणका कर्नाटकापर्यंत

*चौकट
- पुन्हा नवीन चक्रावाताचे सावट
नुकत्याच पुढे सरकलेल्या पश्‍चिमी चक्रीवाताच्या दणक्‍यातून देशातील शेतकरी सावरता आहेत नाहीत तोच त्याच मार्गे आणखी एक पश्‍चिमी चक्रावात येवून धडकण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. या चक्रावाताचा प्रभाव येत्या गुरुवारी (ता.5) रात्रीपासून पश्‍चिम हिमालयीन भागावर पडण्याचा अंदाज आहे. त्याची तिव्रता गेल्या चक्रावाताप्रमाणे वाढल्यास उत्तर मध्य भारतासह महाराष्ट्रातही पुन्हा पाऊस बरसू शकतो. याशिवाय या चक्रीवाताच्या प्रभावाने महाराष्ट्रात थंड वारे दाखल झाले तर सध्या वाढलेल्या बाष्पापासून गारपिट होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पुणे (प्रतिनिधी) ः अफगाणिस्तानच्या बाजूने हिमालयीन भागात दाखल होणाऱ्या पश्‍चिमी चक्रावाताची तिव्रता वाढून त्याचा प्रभाव थेट कर्नाटकपर्यंत जाणवल्यामुळे महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गेल्या तीस वर्षात प्रथमच अशी स्थिती उद्भवल्याची माहिती हवामान विभागातील सुत्रांनी दिली. यापुर्वी 17 फेब्रुवारी 1984 दरम्यान अशीच स्थिती उद्भवून महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी गारपीट व जोरदार पाऊस झाला होता.

हिमालयीन प्रदेशात पश्‍चिमी चक्रावात दाखल होवून ते पुर्वेकडे सरकणे ही नित्याचीच हवामान क्रीया आहे. मॉन्सूनच्या माघारीनंतर देशातील हवामानावर पश्‍चिमी चक्रावातांचा मोठा प्रभाव पडतो. विशेषतः थंडीची लाट महाराष्ट्रात दाखल होणे वा न होणे हे या पश्‍चिमी चक्रावातांच्या प्रभावावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. उत्तर भारतात विशेषतः हिमालयीन भागात या चक्रावातांच्या प्रभावामुळे जोरदार बर्फवृष्टी होते. मात्र पश्‍चिमी चक्रवाताचा थेट दक्षिण भारतापर्यंत प्रभाव ही दुर्मिळ घटना मानली जाते. नेमकीही हिच स्थिती तब्बल तीस वर्षानंतर यंदा उद्भवली आहे.

गेल्या 25 फेब्रुवारीदरम्यान या चक्रावाताच्या प्रभावाची व्यापकता वाढण्यास सुरवात झाली. पाकिस्तानपाठोपाठ राजस्थानवर त्याचा प्रभाव पडला. या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. पुढे त्याचा प्रभाव वाढून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचा विस्तार थेट कर्नाटकपर्यंत वाढला. या स्थितीच्या प्रभावामुळे हिमालयीन भागात जोरदार हिमवृष्टी, पाऊस झाला. देशांतर्गत भागात मॉन्सून सक्रीय असताना काही वेळा कमी दाबाच्या पट्ट्याची अशी स्थिती पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असते. तशाच प्रकारे यावेळी दक्षिणउत्तर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वाऱ्यांची द्रोणीय स्थिती राजस्थान - गुजरात - महाराष्ट्र - कर्नाटक - छत्तीसगड - बिहारपर्यंत असल्याने अरबी समुद्रातून भुभागावर मोठ्या प्रमाणावर बाष्प दाखल झाले. त्यापासून महाराष्ट्रासह मध्य भारतातील राज्यांमध्येही जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, आता देशात पावसाचा धुमाकुळ घालणाऱ्या या पश्‍चिमी चक्रावाताची महाराष्ट्रासह दक्षिण व मध्य भारतावरील प्रभाव कमी झाला आहे. अनेक ठिकाणी हवेचा दाब 1010 हेक्‍झापास्कलवरुन 1012 हेक्‍झापास्कलपर्यंत वाढला आहे. हवेच्या दाबातील बदलाबरोबर बहुतेक ठिकाणी पाऊस थांबला असून पुन्हा कडक ऊन पडण्यास सुरवात झाली आहे. आज-उद्या पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे.

- उपसागर राहीला तटस्थ
पश्‍चिमी चक्रावाताचा कमी दाबाचा पट्टा व त्याला अरबी समुद्राची मिळालेली साथ यामुळे राज्यात जोरदार पाऊस सुरु असताना बंगालचा उपसागर मात्र या सर्व हवामानस्थितींपासून तटस्थ राहीला. उपसागराकडून या कमी दाबाच्या पट्ट्याला बाष्पाची साथ मिळाली नाही. यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहीले. अन्यथा उपसागराकडून जर बाष्पाचा पुरवठा झाला असता तर महाराष्ट्रासह मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार अतिवृष्टी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

*चौकट
- तीस वर्षापुर्वीचा धुमाकुळ
पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे 1984 साली उद्भवलेल्या स्थितीचे साक्षिदार जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, राज्यात अशाच स्थितीमुळे 1984 साली जोरदार पाऊस व गारपीट झाली हे खरे आहे. त्या वेळी मी पुणे कृषी महाविद्यालयाचा फार्म सुपरटेंडंट होतो. तेव्हा 17 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात जोरदार गारपीट व पाऊस झाला. गारांचा आकारही मोठा होता. महाविद्यालयातील सर्व पिके व झाडांचे मोठे नुकसान झाले. उसाचा पाला साळून निघाला होता. राज्यतही अनेक ठिकाणी अशीच स्थिती होती.
--------------- 

No comments:

Post a Comment