Tuesday, March 17, 2015

पशुसंवर्धन लसिकरण मोहीम १० एप्रिलपासून

पुणे (प्रतिनिधी) ः राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचा वर्षभरातील सर्वात महत्वाचा कार्यक्रम असलेली जनावरांना मोफत रोग प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम येत्या 10 एप्रिलपासून सुरु होणार आहे. पशुवैद्यकांमार्फत घरोघर जावून जनावरांना लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, देवी, मानमोडी आदी रोगांवरील लसी देण्यात येणार आहेत. जिल्हा पातळीवर लसींचा पुरवठा करण्याचे काम सध्या पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत वेगाने सुरु आहे.

केंद्र सरकारच्या लाळ्या खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (एफएमडीसीपी) पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात दर वर्षी मार्च व एप्रिलमध्ये गायवर्गीय व म्हैसवर्गिय जनावरांसाठी लाळ्या खुरकत लसिकरण मोहीम राबवली जाते. यंदा 10 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत सलग 21 दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यातील दोन कोटी पैकी राज्यातील एक कोटी 80 लाख (90 टक्के) जनावरांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे.

म्हैस व गायवर्गिय जनावरांची संख्या सर्वाधिक असलेल्या नाशिक व पुणे विभागांतील 12 जिल्हे या लसीकरण मोहीमेच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत घरोघर जावून ही लस टोचण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्ह्यांमधील शितसाखळीद्वारे दवाखान्यांना लसींचा पुरवठा व साठवणूक करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आत्तापर्यंत सुमारे 40 लाख लसींचा पुरवठा झाला असून उर्वरीत सर्व लसी येत्या दहा दिवसात पुरविण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाचे उपायुक्त (रोग नियंत्रण) डॉ. जी. पी. राणे यांनी दिली.

घटसर्प, फऱ्या किंवा एकटांग्या, शेळ्यामेंढ्यांचे विषाणूजन्य रोग, देवी, कोंबड्यांचे मानमोडी आदी रोगांचे नियंत्रण करण्यासाठी मे महिन्यात मॉन्सूनपूर्व लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामार्फत जनावरांच्या संख्येनुसार लसींची मागणी नोंदविण्यात आली असून त्यानुसार पुरवठा करण्यात येणार आहे. लाळ्या खुरकत लसीकरणाची मोहीम गेल्या पाच वर्षापासून तर उर्वरीत रोगांसाठी 2003-04 पासून राज्यात लसिकरण करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेमुळे सर्वच रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण व तिव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, अशी माहिती डॉ. राणे यांनी दिली.

*कोट
""शासकीय पशुवैद्यक दारोदार जावून मोफत लस देतात. मात्र अनेक पशुपालक अज्ञान, गैरसमजातून लस टोचू देत नाहीत. जनावरांचे आरोग्य कायम राखण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.''
- डॉ. जी. पी. राणे, उपायुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे. 

No comments:

Post a Comment