Monday, March 9, 2015

औषधी वनस्पती योजना सुरु

प्रस्ताव पाठविण्याचे मंडळाचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) ः कोणत्याही शासकीय योजनेची अंमलबजावणी होताना आधी योजना मंजूर होवून येते आणि मग इच्छूकांकडून लाभासाठी प्रस्ताव मागविण्यात येतात. राज्य औषधी वनस्पती मंडळाने यंदा हा पायंडा उलटा फिरवला आहे. केंद्राच्या यंदापासून सुरु होत असलेल्या आयुष अभियानातून औषधी वनस्पती विषयक विविध घटकांचा लाभ देण्यासाठी मंडळाने इच्छूकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. राज्यभरातून येणारे सर्व प्रस्ताव केंद्राला सादर करुन त्यांना येत्या वर्षात निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

औषधी वनस्पतींची लागवड व विकासासाठी सर्व स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय आयुष अभियानात औषधी वनस्पती घटक व वनस्पती संरक्षण, संवर्धन, विकास व शाश्‍वत व्यवस्थापन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये वनस्पती लागवडीसाठी आर्थिक सहाय्य, संशोधन, विक्री यासाठी कार्यरत संस्थांना सहाय्य, काढणीपश्‍चित व्यवस्थापन, प्रक्रीया व मुल्यवर्धन, रोपवाटीका निर्मिती, वाळवणीगृह, साठवणगृह, पणन सुविधा, पिक प्रात्यक्षिके, बियाणे वा जनुकीय पेढी, घरगुती औषधी उद्यान आदीसाठी योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यंदा या योजनेतील विविध घटकांच्या अनुदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

विविध घटकांसाठी खासगी संस्था व शेतकऱ्यांना 50 टक्के आणि शासकीय संस्थांना 100 टक्के अनुदान आहे. औषधी वनस्पतींची लागवड व विकासासंबंधी काम करण्यास इच्छूक असलेले राज्यभरातील शेतकरी आणि शासकीय, खासगी व सहकारी संस्थांनी 2015-16 या वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापला घटकनिहाय वार्षिक कृती आराखडा संबंधीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन औषधी वनस्पती मंडळामार्फत करण्यात आले आहे. या प्रस्तावांनुसार मंडळामार्फत राज्याच्या एकत्रित प्रस्ताव तयार करुन राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाला सादर करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः 020 25530755, संकेतस्थळ ः www.indianmedicine.nic.in, www.nmpb.nic.in 

No comments:

Post a Comment