Sunday, March 1, 2015

ठिबक ज्वारी प्रयोग निष्कर्ष - अण्णा टेमगिरेे

ठिबकवरील ज्वारीपासून
एकरी 38 क्विंटल उत्पादन

पुणे (प्रतिनिधी) ः शिरुर तालुक्‍यातील कासारी येथिल मधुकर (अण्णा) टेमगिरे या प्रयोगशिल शेतकऱ्याला ठिबकवरील रब्बी ज्वारी पिकापासून एकरी 38 क्विंटल (हेक्‍टरी 95 क्विंटल) ज्वारी व एक हजार पेंढी कडबा उत्पादन हाती आले आहे. याच पिकाच्या कृषी विभागाच्या शिक्रापूर मंडल कृषी अधिकारी कार्यालयामार्फत झालेल्या कापणी प्रयोगात गुंठ्याला 81 किलो म्हणजेच एकरी 32.40 क्विंटल (हेक्‍टरी 81 क्विंटल) उत्पादन मिळाले आहे.

ऍग्रोवनने एक जानेवारी 2015 च्या अंकात या प्रयोगाची माहिती प्रसिद्ध केली होती. या पिकापासून एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याचा शेतकरी व तज्ज्ञांचाही अंदाज होता. प्रत्यक्षात टेमगिरे यांना एक एकर क्षेत्रापासून सरासरी 120 किलोची 32 पोती ज्वारी उत्पादन मिळाले आहे. अंदाजाहून दोन क्विंटल कमी उत्पादन हाती आले असले तरी हुरडा, संक्रांत, शिवार फेरी, कृषी विभागाची पहाणी, शेतकरी मेळावा व शेतकऱ्यांच्या भेटींदरम्यान तोडण्यात आलेल्या कणसांची गणती यात करण्यात आलेली नाही.

श्री. टेमगिरे म्हणाले, नियोजनाप्रमाणे अपेक्षित उत्पादन मिळाल्याने ठिबकवरील ज्वारीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रयोग अपयशी झाला तर खर्च वाया जावू नये म्हणून या प्रयोगात ठिबकचा खर्च मर्यादीत ठेवण्यासाठी एक बाय एक फुटावर लागवड करुन दोन ओळीत एक लॅटरल ठेवली आणि त्यानंतर दोन फुटांचा पट्टा मोकळा ठेवला. यामुळे ताटांची संख्या एकरी 40 ते 43 हजाराऐवजी फक्त 25 ते 29 हजार राहीली. नांग्या भरल्या पण त्या ताटांना कमी उत्पादन आले. पुढच्या वर्षी पट्टा न ठेवता एक बाय एक फुटावर लागवड करुन यंदाच्या दुप्पट उत्पादन मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

टेमगिरे यांच्याबरोबरच दहीवडी येथिल गजानन इंगळे, करडे येथिल भाऊसाहेब पळसकर, निमोने येथिल गणेश काळे व सहकाऱ्यांनी ठिबकवर ज्वारीचे उत्पादन घेतले होते. यातील काही शेतकऱ्यांची ज्वारी नुकतिच काढून झाली आहे तर काहींची अद्याप काढणे बाकी आहे. या शेतकऱ्यांची पुढील हंगामाच्या नियोजनाची बैठक नुकतिच झाली. त्यात येत्या खरिपात द्विदल पिकाची ठिबकवर लागवड करुन या पिकाच्या बेवडावर रब्बी हंगामात ठिबरवर ज्वारीचे उत्पादन घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यातही अण्णा टेमगिरे यांनी रोपे तयार करुन तर उर्वरीत शेतकरी टोकण पद्धतीने लागवड करणार असल्याचे श्री. टेमगिरे यांनी सांगितले.
--------- 

No comments:

Post a Comment