Friday, March 27, 2015

अवकाळीचे नुकसान क्षेत्र निम्म्याने घटले ?

कृषीचा अंदाज 9 लाख हेक्‍टरचा; केंद्राच्या लेखी 3.95 लाख हेक्‍टर ग्राह्य

पुणे (प्रतिनिधी) ः अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना नुकसानग्रस्त क्षेत्र कमीत कमी दाखविण्याचा खटाटोप राज्यात सुरु असल्याचे उघडकीस येत असतानाच केंद्रातही तोच प्रकार सुरु असल्याचे चित्र आहे. राज्यात सुमारे नऊ लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य कृषी विभागाने जाहिर केला आहे. केंद्रीय कृषी विभागानेही तीन मार्चपर्यंत साडेसात लाख हेक्‍टरचे नुकसान झाल्याचे राज्यसभेत मान्य केले. मात्र आता केंद्राने राज्यात फक्त तीन लाख 95 हजार हेक्‍टर नुकसानग्रस्त क्षेत्र गाह्य धरले आहे.

राज्यात 28 फेब्रुवारीपासून गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. पहिल्या दोन दिवसातच तब्बल साडेसात लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा तडाखा बसल्याचे कृषी विभागाने जाहिर केले. तर फक्त अडीच लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले होते. यानंतर चार मार्च रोजी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रात सात लाख 50 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्यसभेत जाहिर केली होती. पंचनामे अंतिम झाले नसतानाही त्यात आता मोठी कपात करण्यात आली आहे.

दोन मार्चनंतर राज्यात गारपीट व वादळी पावसाची आणखी आवर्तने कोसळून नुकसानीत अधिकच भर पडली. गारपीटग्रस्त क्षेत्रात साडेसात लाख हेक्‍टरहून सुमारे नऊ लाख हेक्‍टरपर्यंत वाढ झाली. या क्षेत्रावरील रब्बी पिकांबरोबरच व फळबागांचेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. मात्र महसूल विभागामार्फत आता वेगळीच माहीती बाहेर येवू लागलेली आहे. धुळे जिल्ह्यासह काही ठिकाणी महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त क्षेत्र कमी दाखविण्याचे प्रकार सुरु असून त्याचेच पडसाद केंद्राच्या नव्या आकडेवारीतही पडल्याचे चित्र आहे.

पंतप्रधानांनी मुख्य सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यापुर्वी राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी व विभागिय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेवून त्यांच्याकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अंदाज घेतला होता. त्यानंतर पंतप्रधानांना नुकसानग्रस्त क्षेत्राची सुधारीत माहीती देण्यात आली. त्यानुसार पुर्वीच्या नुकसानग्रस्त क्षेत्राच्या आकडेवारीत कपात करण्यात आली आहे. केंद्राने महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेर ते 26 मार्च या कालावधीत तीन लाख 95 हजार हेक्‍टरवरील ज्वारी, मका, गहू, हरभरा, कांदा, आंबा, द्राक्ष, काजू व डाळींब या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
--------------- 

No comments:

Post a Comment