Friday, March 20, 2015

सोयाबीन बियाण्याचा यंदा पुन्हा तुटवडा

स्वतःकडील बियाणे साठवण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या खरिपात उशारा झालेला पाऊस आणि ऐन शेंगा भरण्याच्या काळात पडलेला पाण्याचा ताण यामुळे सोयाबीनच्या बिजोत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी येत्या खरिपात सोयाबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरण्यासाठी योग्य तयारी करावी, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले आहे.

येत्या खरिपात ऐनवेळी सोयाबीन बियाणे तुटवड्याची परिस्थिती उद्भवू नये म्हणून कृषी विभागामार्फत सोयाबीन उत्पादकांना बियाण्याची पूर्वतयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे राज्यातील सर्व वाण हे सरळ वाण आहेत. यामुळे सोयाबीनचे दर वर्षी नवीन बियाणे पेरण्याची आवश्‍यता नाही. गेल्या दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे म्हणून वापरावे, असे आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सोयाबीन बियाण्याचा बिजांकूर बाह्य आवरणाच्या लगत असतो. बिजांकुराचे रक्षण करणारे बाह्य आवरण पातळ असल्याने सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते. यामुळे बियाण्यास इजा पोहचू नये व त्याची उगवणक्षमता चांगली रहावी यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. बियाण्यात आद्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी 6 ते 8 धरांची किंवा 7 फुटांपेक्षा जास्त नसावी. याबाबत अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी विभागाचे स्थानिक कार्यालय किंवा 18002334000 या निशुल्क (टोल फ्री) दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
--------------- 

No comments:

Post a Comment