Thursday, March 26, 2015

कोकणात उष्णतेची लाट - 26 मार्च

पारा झेपावला चाळिशीपार; राज्यभर उन्हाच्या झळा वाढल्या !

पुणे (प्रतिनिधी) ः उन्हाळा सुरु झाल्यानंतर चालू हंगामात प्रथमच राज्यात उष्णतेची लाट दाखल झाली आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा, खानदेश या पारंपरिक उन्हाळी भागाऐवजी कोकणात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊसही झाला. राज्यातील चारही विभागांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार झेपावला असून त्यामुळे उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकाच वेळी पावसाचे सावट आणि उन्हाच्या झळा अशा दुहेरी संकटात उन्हाळी पिके व फळबागा सापडल्या आहेत.

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता असतानाच कमाल तापमानाचा पारा वेगाने झेपावला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात रायगड जिल्ह्यातील भिरा येथे राज्यात सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. खानदेशात जळगावला 40.3 अंश, मध्य महाराष्ट्रात सोलापूरात 41 अंश, मराठवाड्यात उस्मानाबादला 40 अंश तर विदर्भात चंद्रपूरला 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात कमाल तापमानात एक दोन अंशांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

येत्या रविवारी सकाळपर्यंत (ता.29) कोकणात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्याच्या उर्वरीत भागात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. रविवारी व सोमवारी (ता.29, 30) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकणात एक दोन ठिकाणी ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. लांजा, दापोली, राधानगरी आदी ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

- हर्णेत पाऱ्याची 11 अंशांची झेप
कोकणात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून चार ते आठ अंशांनी वाढले आहे. मुंबईतील सांताक्रुझ, रायगडमधील भिरा व रत्नागिरीतील हर्णे या ठिकाणी उष्णतेत मोठी वाढ झाली. हर्णेचे कमाल तापमान सरासरीहून तब्बल 11 अंश सेल्सिअसने वाढले. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीहून दोन ते चार अंश सेल्सिअसने तर विदर्भात दोन ते तीन अंश सेल्सिअसने उंचावले आहे. पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमान सरासरीहून एक ते चार अंश सेल्सिअसने उंचावलेले आहे.

- आद्रतेत 25-30 टक्‍क्‍यांनी वाढ
राज्यात अनेक ठिकाणी सापेक्ष आद्रतेत सरासरीहून तब्बल 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात सांगलीत सर्वाधीक 90 टक्के सापेक्ष आद्रता होती. कोकणात बहुतेक ठिकाणी आद्रता 85 टक्‍क्‍यांच्या आसपास होती. ब्रम्हपुरी (70 टक्के), यवतमाळ (60 टक्के), कोल्हापूर (85 टक्के), पुणे (80 टक्के), नाशिक (60 टक्के) या ठिकाणी सापेक्ष आद्रतेत सरासरीहून मोठी वाढ झाली.

गुरुवारी (ता.26) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 36.3 (27), सांताक्रुझ 41 (25.6), अलिबाग 36.2 (26), रत्नागिरी 34.4 (24.6), पणजी 33.8 (26.3), डहाणू 34.8 (25), भिरा 43.5, हर्णे 40 (27), पुणे 37.7 (19.9), जळगाव 40.3 (19.8), कोल्हापूर 36.6 (23.6), महाबळेश्‍वर 32.8 (19.6), मालेगाव 40.8 (18.2), नाशिक 38.5 (19.4), सांगली 37.4 (22.7), सातारा 38.2 (20.5), सोलापूर 40.8 (24.5), उस्मानाबाद 40 (21.1), औरंगाबाद 38.4 (22), परभणी 39.1 (22.2), अकोला 40.5 (22.1), अमरावती 37.8 (24.4), बुलडाणा 37.2 (23.6), ब्रम्हपुरी 39.7 (21.6), चंद्रपूूर 40.4 (21.2), नागपूर 39.8 (18.7), वाशिम 38.2 (24.4), वर्धा 39 (20.6), यवतमाळ 36.8 (21)
------------

No comments:

Post a Comment