Tuesday, March 24, 2015

नारायणगाव केव्हीके बटाटा बिजोत्पादन

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात
बटाटा बिजोत्पादनाची मुहुर्तमेढ
-----------
संतोष डुकरे
-----------
बटाटा पिक उत्पादनात दर्जेदार भेसळमुक्त बियाणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात या आघाडीवर आत्तापर्यंत काहीच काम झालेले नाही. मात्र आता आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या पुढाकाराने नारायणगाव (जि. पुणे) येथिल कृषी विज्ञान केंद्रामार्फत राज्यासाठी बटाटा बिजोत्पादन करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा नुकताच यशस्वीपणे पूर्ण झाला. या प्रकल्पाविषयी...
-----------
बटाटा हे महाराष्ट्राच्या पठारी भागातील महत्वाचे नगदी पिक. पुणे व सातारा जिल्ह्यात त्याचे क्षेत्र मोठे आहे. मात्र बटाटे बियाण्यासाठी संपूर्ण राज्य हिमाचल प्रदेशवर अवलंबून आहे. हे परावलंबित्व संपवून राज्यासाठी राज्यातच बटाट्याचे दर्जेदार बिजोत्पादन करण्याचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र, भारतीय कृषी संशोधन परिषद व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्पा यशस्वी झाला असून दुसऱ्या टप्प्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व मुळशी तालुक्‍यांत शेतकऱ्यांच्या शेतावर बिजोत्पादन करण्यात येणार आहे.

बटाटा उत्पादकांना बियाण्यातील भेसळ, हलक्‍या दर्जाच्या बियाण्यामुळे उत्पादनातील घसरण, रोग व किडींचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या दुर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रामार्फत (लिमा, पेरु) विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. बांग्लादेशमध्ये बटाटा बिजोत्पादनाचा प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यानंतर भारतात कर्नाटक व महाराष्ट्रात हा प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने कर्नाटकसाठी शिमोगा विद्यापीठात तर महाराष्ट्रासाठी नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्राची निवड करण्यात आली. मावा किडीचा प्रादुर्भाव, विषाणूजन्य करपा मुक्त भाग आदी निकषांवर ही निवड झाली.

नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्रामार्फत नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामात नारायणगाव (पुणे), पुसेगाव व खटाव (सातारा) या ठिकाणी प्रक्षेत्र चाचण्या घेण्यात आल्या. यासाठी सिमला येथिल केंद्रीय बटाटा संशोधन केंद्रातून कुफरी लवकर या वाणाचे "ब्रिडर सिड' आणले व ते इन्सेक्‍ट नेट हाऊसमध्ये लावण्यात आले. नारायणगावमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या 30 गुंठे क्षेत्रावर 12 क्विंटल बियाण्याची लागवड झाली. काढणीच्या 20 दिवस आधी संपूर्ण पाला काढण्यात आला. याक्षेत्रात सहा टन बिजोत्पादन झाले. हे बियाणे सध्या नगर येथे शितगृहात ठेवण्यात आले आहे. रब्बीत बटाटा बिजोत्पादन केल्यानंतर हे बियाणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने शितगृहात साठवावे लागते. यासाठी सध्या एका महिन्यासाठी एका किलोला 50 पैसे या दराने प्रति किलोस चार महिन्यांसाठी दोन ते अडीच रुपये खर्च येत आहे.

येत्या ऑक्‍टोबरमध्ये या बियाण्यापासून पुणे जिल्ह्यांच्या मावळ पट्ट्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाच शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर बिजोत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठीची शेतकरी निवड प्रक्रीया सध्या सुरु आहे. पुढच्या वर्षापासून जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व मुळशी या पाचही तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बटाटा बिजोत्पादनात सामावून घेतले जाणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे हे बियाणे उन्हाळ्यात शितगृहात साठवण केल्यानंतर मंचरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

- वाण चाचण्याही सुरु
कृषी विज्ञान केंद्रात आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या बटाट्याच्या 12 वाणांच्या चाचण्याही नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामात घेण्यात आल्या. उत्पादन, चव, न्युट्रीयन्ट व्यल्यू आदी निकषांवर नारायणगाव, मंचर परिसरामध्ये कोणता वाण चांगला राहील, उच्च उत्पादन मिळेल, साठवणीत गुणवत्ता चांगली राहील, चव, आकार व रंग चांगला राहील आदी बाबींचा अभ्यास या वाणांचा करण्यात येत आहे. यातून स्थानिक भागासाठीची सर्वोत्तम जात निवडण्यास मदत होणार आहे.
-----------------------
""बदलत्या वातावरणात भात पिक धोक्‍यात आहे. गहू व हरभरा संपूर्ण वर्षाचे उत्पन्न देण्यात अपुरा ठरतोय. बटाटा बिजोत्पादनामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना नगदी पिकाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. बियाण्याचा दर किमान 25 रुपये प्रतिकिलो असतो. एकरी आठ टन उत्पादन अपेक्षित आहे.''
- संतोष सहाणे, प्रकल्प समन्वयक, केव्हीके, नारायणगाव
------------------------
- बटाटा बिजोत्पादन प्रयोग
क्षेत्र - 30 गुंठे
बियाणे - कुफरी लवकर, ब्रिडर सिड
लागवड - 3 नोव्हेंबर 2014
काढणी - 28 जानेवारी 2015
उत्पादन - 6 टन
-------------------------
बिजोत्पादनाची वैशिष्ट्ये
- किड रोगांचा प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्राची निवड
- योग्य वेळी लागवड, मुलभूत बियाण्याचा वापर
- ठिबक सिंचनाचा वापर, फर्टिगेशन
- 80/80 एमएम इन्सेक्‍ट नेट हाऊसमध्ये उत्पादन
- काढणीआधी 20 ते 30 दिवस पाला काढणे
- किड रोग व्यवस्थापनासाठी काटेकोर उपाय
--------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क ः संतोष सहाणे 7588034502
--------------------------









No comments:

Post a Comment