Friday, March 27, 2015

नुकसानग्रस्त क्षेत्र 75 लाखाने घटवले

पंतप्रधानांच्या बैठकीत बदलली आकडेवारी

नवी दिल्ली ः देशातील 14 राज्यांमध्ये चालू रब्बी हंगामात फेब्रुवारी अखेरपासून झालेला पाऊस, वादळी वारे व गारपिटीने तब्बल 181 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे राज्यांनी केंद्राला कळविले होते. मात्र आता केंद्राने या नुकसानग्रस्त क्षेत्रात तब्बल 75 लाख हेक्‍टरने घट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानग्रस्त राज्यांच्या मुख्य सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्र 106 लाख हेक्‍टर करण्यात आल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत सर्व राज्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून नुकसानग्रस्तांना योग्य मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत. आपत्ती निवारण निधीत मदतीसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्यास राज्य सरकार आपल्या आपत्कालिन निधीतूनही यासाठी खर्च करु करुन राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडे आणखी निधीची मागणी करु शकते. केंद्र सरकारमार्फत राज्यांना शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे व पीक विमा वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आत्तापर्यंत सात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी नुकसानीच्या अंदाजाची माहिती केंद्रीय कृषी विभागाला दिलेली आहे. आता राज्यांनी पिकांच्या नुकसानीची अंतिम माहिती केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवावी अशा सुचना केंद्रमार्फत सर्व नुकसानग्रस्त राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.

- राजस्थानला सर्वाधिक फटका ?
केंद्रीय कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या नुकसानीच्या माहितीनुसार देशात फेब्रुवारी अखेर ते 26 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस, वारे यामुळे राजस्थानमध्ये सर्वाधिक 45 लाख 52 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 17 लाख हेक्‍टर गहू, 15 लाख हेक्‍टर मोहरी, पाच लाख हेक्‍टर कडधान्ये आदी पिकांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे नुकसानग्रस्त क्षेत्र तीन लाख 95 हजार हेक्‍टर तर गुजराजचे 11 हजार 400 हेक्‍टर आहे. आंध्र प्रदेशमध्ये सर्वात कमी 200 हेक्‍टरील पिकांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पिके व क्षेत्राची अंतिम माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

- राज्यनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (लाख हेक्‍टर)
राजस्थान 45.527, उत्तर प्रदेश 26.79, हरियाणा 18.75, मध्य प्रदेश 5.70, महाराष्ट्र 3.95, पंजाब 2.94, हिमाचल प्रदेश 1.52, पश्‍चिम बंगाल 0.485, गुजरात 0.114, जम्मू काश्‍मिर 0.85, उत्तराखंड 0.091, तेलंगणा 0.006, केरळ 0.006, आंध्र प्रदेश 0.002
-------------- 

No comments:

Post a Comment