Monday, March 16, 2015

नुकसानग्रस्त क्षेत्र साडेआठ लाख हेक्‍टरवर

पाच दिवसात गारपीटीचा
55 हजार हेक्‍टरला फटका

पुणे (प्रतिनिधी) ः यंदाच्या मार्चचा पहिला पंधरवडा हा राज्यातील शेतीसाठी गेल्या काही वर्षातील सर्वाधिक बाधक कालखंड ठरल्याचे चित्र आहे. या पंधरा दिवसात राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, पाऊस व गारपीटीचा पिकांना तडाखा बसला आहे. पहिल्या पाच दिवसात साडेसात लाख हेक्‍टर, त्यानंतरच्या पाच दिवसात सुमारे 50 हजार हेक्‍टर आणि आता गेल्या पाच दिवसात आणखी 55 हजार हेक्‍टर अशा एकूण साडेआठ लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वारे, पाऊस व गारपीटीचा पहिला तडाखा 28 फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान 29 जिल्ह्यांतील साडेसात लाख हेक्‍टर क्षेत्राला बसला. यानंतर 11 मार्चपर्यंत त्यात यवतमाळ, वाशिम, अमरावती, नगर, सांगली, अकोला, नगर, सातारा, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांतील आणखी 50 हजार हेक्‍टरची भर पडली. आता गेल्या पाच दिवसात 18 जिल्ह्यांत अवकाळीचा फटका बसला आहे. यात वर्धा, नाशिक, जळगाव, नगर, धुळे, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. यात एकूण 55 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या पाच दिवसात झालेल्या नुकसानीमध्ये फळपिकांचे नुकसान सर्वाधिक असून कांदा, टोमॅटो, डाळींब, पपई, स्ट्रॉबेरी याबरोबरच संत्रा व मोसंबी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागामार्फत कृषी व ग्रामविकास विभागांच्या मदतीने सुरु आहे.
------------ 

No comments:

Post a Comment