Tuesday, March 24, 2015

सेंद्रीय शेती धोरण मागण्या... शेतकरी प्रतिक्रीया

टीम ऍग्रोवन
पुणे ः राज्य शासनामार्फत नव्याने होवू घातलेल्या नव्या सेंद्रीय शेती धोरणात सेंद्रीय शेती संशोधन, विकास, प्रशिक्षण व प्रसारावर सर्वाधिक भर द्यावा, हे धोरण देशी गाई केंद्रीत असावे, उत्पादीत सेंद्रीय शेतमालासाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था उभारावी, धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी व त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करावी, अशा विविध मागण्या राज्यभरातील सेंद्रीय शेतमाल उत्पादक शेतकरी व तज्ज्ञांनी केल्या आहेत.

- मधमाशीपालनाचा समावेश करावा
सेंद्रिय अन्नधान्य, फळे व भाजीपाल्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन शासनाने व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी. जेणेकरून सेंद्रिय शेतीतून उत्पादित मालाची विक्री वाढू शकेल व संबंधित शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच योग्य मार्केट मिळेल. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ताग, धैंचा यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात यावा. सेंद्रिय निविष्ठांच्या निर्मितीसाठी देशी जनावरांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. गायींच्या संगोपनासह गोठ्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्था करावी. सेंद्रिय शेतीला पूरक मधमाशी पालन करण्यासाठीही धोरणात योग्य ती तरतूद असावी.
- माणिकराव कासार, सेंद्रिय शेतमाल उत्पादक, शेवगेदारणा, जि. नाशिक.


- प्रशिक्षण व अनुदान हवे
सेंद्रिय शेती करण्यासाठी अनेक शेतकरी इच्छुक असतात. परंतु, योग्य त्या मार्गदर्शनाअभावी अनेकजण मागे पडतात. जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करण्यासह पिकांना वापरण्याच्या बाबतीत शेतकरी अनभिज्ञच असतात. हे लक्षात घेता कृषी विभागाने सेंद्रिय शेतीचे धोरण तयार करताना शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. कृषी विभागातर्फे बऱ्याचवेळा कालबाह्य सेंद्रिय निविष्ठांचा पुरवठा केला जातो. त्यावर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा पुरविण्यात याव्यात. थेट रोख अनुदान देण्याऐवजी निविष्ठांच्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा. जातिवंत देशी गायींचा पुरवठा करण्यासह गोठा व खाद्य व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य द्यावे.
- सदाशिव शेळके, सेंद्रिय शेतकरी, मानोरी, जि. नाशिक.


- देशी गाई हवी केंद्रस्थानी
सेंद्रिय शेतीचे धोरण देशी गाईला केंद्रबिंदू ठेवून केले पाहिजे. मागे अनेकदा गाईला दुर्लक्षित करून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहिली मात्र या चळवळीत देशी गाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही चळवळ उभी राहू शकलेली नाही. यामुळे गाईला केंद्रबिंदु ठेवून शासन व विद्यापीठानी सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिके उभी केली पाहिजेत. जेणेकरून ही प्रात्याक्षिके पाहून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील.
- अशोक इंगवले, सेंद्रिय शेतकरी, बिदाल, जि. सातारा.


- स्वतंत्र बाजारपेठ हवी
सिक्कीम राज्यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक, औषधे आयात बंद केल्याने या राज्यात पुर्णपणे सेंद्रिय शेती केली जाते. याच धर्तीवर शासनाने रासायनिक खते व औषधाच्या उत्पादन कमी केली पाहिजेत, यामुळे शेतकरी आपोआप सेंद्रिय शेतीकडे वळेल. सद्य परिस्थितीतही काही प्रमाणात शेतकरी सेंद्रिय शेती करत आहे, मात्र त्यासाठी बाजारपेठ नसल्यामुळे सेंद्रीय उत्पादन विक्री करताना अनेक अडचणी येत आहेत. सेंद्रिय शेती जास्तीजास्त होण्यासाठी शासनानेच सेंद्रिय उत्पादना विक्रीसाठी स्वंतत्र बाजारपेठ निर्माण केली पाहिजे. तसेच सेंद्रिय उत्पादन तपासणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर यंत्रणा निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सेंद्रिय धोरण आणले पाहिजे.
- मनोहर साळुंखे, सेंद्रीय शेती कृषिभूषण, नागठाणे, जि. सातारा.


- धोरण फक्त कागदावर राहू नये
सेंद्रीय शेतीचा म्हणावा तसा प्रचार प्रसार झालेला नाही. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर सर्वाधिक भर देण्याची गरज आहे. कृषी विद्यापिठातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात जुजबी स्वरूपाचे सेंद्रीय शेतीज्ञान आहे. विद्यार्थ्यांना गांभीर्याने सेंद्रीय शेतीचे ज्ञान देण्याची गरज आहे. रासायनीक खतांनी जमीनीची पोत पुरती घालविली आहे. तंत्रज्ञानाच प्रसार झपाट्याने होत आहे. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या सेंद्रीय शेतीचा विचार करण्याची मानसीकता अद्यापही नाही. जोवर शेतकऱ्याचा उकीरडा खड्यातून बाहेर काढण्याकडे लक्ष दिले जात नाही, तोवर सेंद्रीय शेती क्रांती अवघड आहे. खड्यातून बाहेर काढलेल्या उकीरड्यातील खताचे कंपोस्ट निर्मिती व वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषीबरोबरच ग्रामसेवकाची मदत घेता येवू शकते. गटाच्या माध्यमातून सेंद्रीय खत उत्पादक कंपनी निर्माण करणेही शक्‍य आहे. राज्य सरकारने सेंद्रीय शेतीचे धोरण ठरविताना ते कागदावर राहू नये, याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.
- शिवराम घोडके, कृषीभूषण, बीड


- देशी गोधनाचे जतन आवश्‍यक
सेंद्रीय शेतीचे मुळ गायीभोवती केंद्रीत आहे. यामुळे देशी गोधनाचे जतन होण्यासोबतच हे धन वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतीत काम करणाऱ्यांच्या अनुभवाचा वापर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी करायला हवा. रासायनीक शेतीप्रमाणेच सेंद्रीय शेतीच्या प्रचार प्रसारातील बाजारीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ते थांबविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना एनपीके व डीएपी घरीच तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. सेंद्रीय शेती वृक्ष लागवडीशिवाय यशस्वी होणे नाही. त्यामुळे सेंद्रीय शेती करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना बांधावर झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करणारी योजना राबवावी. कृषी विभाग, सेंद्रीय शेतीचे जाणकार व शेतकरी यांचा समन्वय साधण्यावर शासनाने भर द्यावा.
- महादेव गोमारे, महाराष्ट्र विभाग प्रमुख, आर्ट ऑफ लिव्हींग, लातूर


- स्वतंत्र यंत्रणेची गरज
सेंद्रीय शेती आणि धोरणाची वारंवार चर्चा होते. परंतू प्रत्यक्षात त्याकरीता पूरक संसाधनाची उपलब्धता होत नाही. सेंद्रीय शेती म्हणजे नेमके काय ? याविषयी काहीच ठोकताळे नाहीत. त्यामुळे याविषयीच्या संशोधन व प्रशिक्षणाकरीता स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे. सद्या उपलब्ध मनुष्यबळावरच कारभार सांभाळण्याचा सल्ला दिला जातो. परंतू आधीच एका व्यक्‍तीकडे अनेक विभागाचे प्रभार आहेत. रिक्‍तपदांचा भरणा होत नाही. रेसीड्यू ऍनालिसीस लॅबची उभारणी प्रत्येक विद्यापीठ स्तरावर झाली पाहिजे. खासगी प्रयोगशाळा व्यवसायीक यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. सेंद्रीय शेतमालाच्या खरेदी विक्रीकरीता स्वतंत्र बाजारपेठ किंवा अशाप्रकारच्या शेतमालाच्या मुल्यवर्धनाकरीता वेगळी सोय धोरणात असावी. सरळ वाणांचे संरक्षणाकरीता बियाणे बॅंक तालुका, जिल्हा पातळीवर उभारली पाहिजे.
- प्रा. विनोद खडसे, सेंद्रीय शेती अभ्यासक्रम प्रशिक्षक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.


...तर अवस्था रासायनिक सारखी
पिकांसाठी आवश्‍यक पोषक घटकांची उपलब्धता ही गावपातळीवरील संसाधनातूनच होण्याची गरज आहे. तसे न झाल्यास बहुराष्ट्रीय कंपण्या पुन्हा सेंद्रीय निविष्ठांच्या बाजारपेठेचा ताबा मिळवतील. रासायनीक शेतीसारखीच सेंद्रीय शेतीची अवस्था त्यामुळे होईल. निंबोळी अर्क, करंज यासारख्या घटकांचा सेंद्रीय शेतीत समावेश होतो. त्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी गावातील पडीक जागांचा वापर करण्याची मुभा असावी. 47 टक्‍के जमिनी आजच्या घडीला अशक्‍त आहेत. त्यांच्यामधील अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्याकरीता विशेष योजनांचा समावेश धोरणात असला पाहिजे. रासायनीक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती महागडी आहे. मजूरांची याकरीता जास्त गरज भासते. त्या पार्श्‍वभूमीवर सेंद्रीय शेतमालाचा हमीभाव ठरविण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारली पाहिजे.
- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगूरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.


- सेंद्रीय नको, नैसर्गिक शेती धोरण हवे !
कंपोष्ट, व्हर्मी कंपोस्ट, बायोडायनामीक या सारखे सेंद्रीय शेतीसाठी गरजेचे तंत्र भारतात विकसीत झालेच नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या शेती धोरणाचा प्रचार प्रसार स्वदेशीला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाकडून अपेक्षीत नाही. सेंद्रीय शेतीने कोणालाही उत्पादन दिलेले नाही. उलट सेंद्रीय शेतीमुळे उत्पादकता कमी होत असल्याचा अनुभव आहे. असे निराश झालेले शेतकरी पुन्हा रासायनीक शेतीकडे वळले. त्यामुळे शासनाने सेंद्रीय शेतीऐवजी झिरो बजेट नैसर्गीक शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. या तंत्रज्ञानात निविष्ठांची गरज पडत नाही. रासायनीक व सेंद्रीय शेती करणाऱ्यांच्या आत्महत्या असतील. परंतू झिरो बजेट नैसर्गीक शेती कसणाऱ्याने कधी आत्महत्या केल्याची नोंद नाही. या तंत्रज्ञानात काहीच विकत घ्यावे लागत नाही. उत्पादन खर्च शुन्य असल्याने कर्जबाजारी होण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही.
- सुभाष पाळेकर, प्रवर्तक, झिरोबजेट नैसर्गीक शेती तंत्र, अमरावती.

- प्रमाणिकरण शासनाने करावे
सेंद्रिय शेतीचे धोरण राबविताना त्यात तळागळातील प्रत्येक शेतकऱ्याचा विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून पिकविलेले अन्नधान्य, फळे व भाजीपाल्याच्या विक्रीसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था उभी करावी. संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जादा भाव देण्याची तरतूद करण्यात यावी. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे काम खासगी संस्थांवर सोपविलेले असल्याने, शेतकऱ्यांना त्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च होतो. प्रमाणिकरणाची जबाबदारी स्वतः शासनाने स्वीकारल्यानंतर सेंद्रिय शेतीला आपोआप चालना मिळेल. गटाचा आग्रह न धरता वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बळ देण्यासाठी प्रयत्न करावे. सेंद्रिय शेती धोरणाची अंमलबजावणी विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर प्रभावीपणे करावी.
- विश्‍वासराव पाटील, सेंद्रिय शेतीचे अभ्यासक, लोहारा, जि. जळगाव.


- प्रत्येक तालुक्‍यात हवे मार्गदर्शन केंद्र
सेंद्रिय शेतीत उत्पादित मालाचे मार्केटिंग तंत्र, याविषयी फार माहिती नसल्याने अनेक शेतकरी इच्छा असूनही सेंद्रिय शेतीत उतरत नाही. यापार्श्‍वभूमीवर शासनाने दीर्घकालीन सेंद्रिय शेतीचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी पावले उचलली पाहिजे. साधारणतः प्रत्येक तालुक्‍यात एक केंद्र कार्यान्वित झाले तरी सेंद्रिय शेती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. सेंद्रिय शेतीत पिकांची जोपासना करण्यासाठी आवश्‍यक निविष्ठांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण थेट शेतकऱ्यांना द्यावे. खासगी कंपन्यांच्या निविष्ठा निकृष्ट असल्याने बऱ्याचवेळा शेतकऱ्यांची फसवणूक होती. सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य विक्रीसाठी स्वतंत्र आठवडी बाजार सुरू करावे. धान्य महोत्सवात सेंद्रिय मालासाठी खास स्टॉलची सोय करावी.
- सतीश काटे, सेंद्रिय शेतकरी, कोळपिंप्री, जि. जळगाव.


- जाचक अटी वगळाव्यात
सेंद्रिय शेतीत सातत्याने प्रयोग करणारे लहान गटातील शेतकरी कायम दुर्लक्षित असतात. कृषी विभाग त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. सेंद्रिय शेतीचे धोरण आखतानाही जाचक अटी वगळून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार व्हावा. कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेतीवर संशोधन सुरू करण्यात यावे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाजारपेठेची अडचण येत असल्यामुळे स्वतः शासनाने सेंद्रिय उत्पादने खरेदीची हमी घ्यावी. सेंद्रिय शेतीसाठी पूरक ठरणारी देशी गाय सांभाळण्यासाठी शेतकऱ्यास मदतीचा हात द्यावा. बाजारात मिळणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सेंद्रिय निविष्ठा महागड्या व बेभरवशाच्या असतात. त्यांच्या उत्पादनावरही शासनाने नियंत्रण आणावे. प्रमाणीकरणासाठी कृषी विभाग शेतीच्या बांधावर जाईल, अशी व्यवस्था करावी.
- भीमराव पाटील, सेंद्रिय शेतकरी, सोनाळा, जि. जळगाव.
---------(समाप्त)-------- 

No comments:

Post a Comment