Sunday, March 1, 2015

यशोगाथा - ऊस बटाटा आंतरपिक - वस्ताद दौंडकर


दौंडकरवाडीच्या वस्तादांचा
बटाटा उत्पादनात धोबीपछाड

उसात बटाट्याचे विक्रमी उत्पादन; उशीरा आंतरपिकाचा अभिनव प्रयोग
--------------
सर्वसाधारणपणे ऊस पिकात बटाट्याचे आंतरपिक घेताना आधी बटाट्याची व नंतर उसाची लागवड केली जाते. बटाट्याला सुक्ष्म सिंचन करायचे तर जोड ओळ पद्धतीने लागवड केली जाते. मात्र या दोन्ही पद्धतींना छेद देवून दौंडकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथिल शेतकरी वस्ताद मारुती दौंडकर यांनी ऊस लागवडीनंतर एक महिन्याने त्यात बटाट्याची लागवड करुन ठिबक सिंचनावर 12 गुंठ्यात तब्बल 44 क्विंटल उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांच्या भाषेत एक कट्टा बियाण्याला 39 कट्टे एवढे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
---------------
संतोष डुकरे
---------------
दौंडकर कुटुंबिय गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून बटाट्याचे उत्पादन घेत आहेत. पारंपरीक बटाटा लागवडीत त्यांची मास्टरकी आहे. मात्र यानंतरही एवढ्या वर्षात त्यांनी यंदा प्रथमच अपघाताने बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळविले आहे. अपघाताने असं एवढ्यासाठी की हे उत्पादन घेताना तसे कोणतेही नियोजन नव्हते. अचानक ठरेल, अडचण येईल तशी उपाययोजना करत गेले आणि सर्व बाजूंची साथ मिळून यश मिळाले असा हा अभिनव प्रयोग आहे.

झाले असे की, यंदा बटाटा लावायचे वस्ताद यांच्या मनात नव्हते. गावातील इतर शेतकऱ्यांनी बटाटा लावल्यानंतर वस्ताद यांचे जेष्ठ बंधू दत्तात्रय यांच्या अति आग्रहाखातर घरच्यापुरते बटाटे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंचरहून एक कट्टा बियाणे आणायचे ठरले. पण नेहमी मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याने एक कट्टा बियाणे विकत घेणे म्हणजे लाजिरवाणे वाटते. मग वस्तादांनी नेहमीच्या व्यापाऱ्याला लागवडीला बियाणे कमी पडलेय असे सांगून दोन कट्टे पोखराज 166, 6 नंबर गोटी बियाणे विकत आणले.

बियाणे आणले पण लावायचे कुठे... शेवटी नव्यानेच लागवड केलेल्या उसात आंतरपिक म्हणून लागवड करण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. ऊस लागवडीआधी या क्षेत्रात दोडक्‍याचे पिक होते. दोडका काढल्यानंतर उभी आडवी फणनी करुन रोटावेटरने माती बारिक केली होती. यानंतर घरच्याच छोट्या ट्रॅक्‍टरने चार फुट अंतरावर ऊस लागवडीसाठी सरी पाडली. दहा बारा दिवसांनी फुले 265 या वाणाची लागवड केली. एक महिन्यात उसाची पूर्ण उगवण झाली.

ऊस महिन्याचा झाल्यानंतर 17 नोव्हेंबर 2014 रोजी दोन सऱ्यांच्या मधील पट्ट्यातील अडीच फुटांच्या गादीवर गळभरणीची छोटी नांगरी हाताने ओढून सरी पाडली. ही सरी भिजवून घ्यायची ठरली, मात्र दोनच दिवसांनी मध्यम हलका पाऊस झाला. वाफसा लगेच आला. मग पुन्हा हातनांगरी फिरवून सरी उजाळून घेतली आणि त्यात सहा इंचावर बटाट्याच्या फोडींची लागवड केली. सर्व सऱ्यांमध्ये एकूण तीन बैलगाड्या शेणखत पसरले. त्यावर एक गोणी डीएपी खत टाकले. बटाटे व त्यावरील खत मातीने झाकून टाकले.

तीन चार दिवसात बटाट्याला कोंब फुटायला सुरवात झाली. एक आठवड्याने हलके पाटपाणी दिले. लागवडीनंतर 15 दिवसात चांगली उगवण झाली. तीन आठवड्यांनी 25 किलो युरिया खोडाच्या बाजूला देवून झाडांना भर लावून घेतली. हिवाळा असल्याने उसाला पाण्याची जास्त गरज नव्हती. महिन्याकाठी एखादे पाटपाणी पाणी पुरेसे होते. त्यात बटाटा गादीवर म्हणजे उसाहून अधिक उंचीवर. यामुळे बटाट्याला पाणी देण्याचा प्रश्‍न निर्माण जाला. पाटपाणी गादीवर चढेना. मग ऐनवेळी त्यासाठी ठिबक करण्याचा निर्णय घेतला.

बटाट्याला ठिबक करायचे तर त्यासाठीची फिल्टर इ. कोणतीही यंत्रणा नाही. नदीवरुन उपसा सिंचनाने पाणी येत असल्याने पाण्यात कचरा इ. समस्या होत्याच. शेवटी यापुर्वी फुलकोबी (फ्लॉवर) पिकासाठी वापरलेल्या कमी किमतीच्या प्लॅस्टिक लॅटरल (लॉ कॉस्ट ठिबक - पेप्सी) वापरुन आहे या स्थितीत बटाट्याच्या गादीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. उसाच्या सर्व सऱ्यांना सारख्या प्रमाणात पाणी जावे म्हणून पाईपला प्रत्येक सरीसमोर एक छिद्र पाडून पाणी देण्याची सोय यापुर्वीच केलेली होती. त्याच पाईपला या जुन्या लॅटरल जोडल्या आणि बटाट्याला ठिबकने पाणी द्यायला सुरवात केली.

बटाट्याचा उतार पावसाच्या ओलीवर झाला होता. त्यानंतर उसाला दिलेल्या पाण्याची जेमतेम ओल गादीला मिळाली. आणि तीन आठवड्यानंतर बटाट्याला भर लावल्यावर ठिबक सिंचनाची सोय झाली. सर्वसाधारणपणे 8 ते 10 दिवसांच्या अंतराने बटाट्याला पाण्याच्या पाळ्या दिल्या. प्रत्येक पाळीत तीन तास ठिबक चालवले. महिन्याच्या अंतराने उसाच्या सरीला पाटपाणी सोडत होते. ठिबकचा उपयोग फक्त पाणी देण्यापुरताच केला. त्यातून खते किंवा औषधे दिली नाहीत.

हिवाळ्याचे वातावरण असल्याने हवामान थंड होते. थंडी जास्त कडकही नव्हती आणि सौम्यही नव्हती. मध्यम स्वरुपाची आल्हाददायक वातावरण होते. दरम्यानच्या काळात करपा किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दोन फवारण्या केल्या. रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी बटाटे तीन आठवड्याचे झाल्यानंतर त्यात एक फुटाच्या उंचीवर पिवळे चिकट सापळे लावले.

लागवडीनंतर बरोबर 90 ते 92 दिवसात बटाटा काढणीला आला. मात्र तोपर्यंतही बटाट्याला पाला पडलेला नव्हता. प्रत्येक सरीत ऊस आणि प्रत्येक गादीवर बटाटा असल्याने बटाटे काढायचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला. कारण सर्वसाधारणपणे बैलांचा नांगर हाकून बटाटा काढला जातो. इथे बैलांना चालायला जागा नव्हती. एक तर ऊसाचे कोंब मोंडणार नाही तर गादी भुसभुशीत असल्याने बैलांच्या पायांनी बटाटे फुटणार. शेवटी एकाआड एक सरी बटाटा उपटून काढण्याचे ठरले. एकूण 30-35 पिशव्या बटाटा निघेल असा अंदाज होता. त्या हिशेबाने बारदाना विकत आणला होता. मात्र एकाआडएक नऊ सरी उपलट्या आणि त्यातच 35 पिशव्या बटाटा निघाला. एकेका झाडाला 8 ते 10 बटाटे आणि सरासरी प्रत्येक बटाटा 500 ग्रॅमहून अधिक वजनाचा. हे गळीत पाहून वस्तादांबरोबरच गावातील भल्या भल्या बटाटा उत्पादकांनी तोंडात बोटे घातली.

एकाआड एक सरी बटाटा उपटून काढल्यानंतर बाकी सऱ्यांचा पाला काढून बैलांची नांगरी हाकली. हाताने उपटलेल्या सऱ्यांमध्येही नांगरी हाकल्यानंतर आणखी बटाटे निघाले. दोन दिवस काढणी चालली. घरचे बैल आणि घरच्यासह एकूण 15 मजूर लागले. सरतेशेवटी एकूण 12 गुंठे क्षेत्रावरील उसाच्या 21 सऱ्यांमधील आंतरपिकातून बटाट्याच्या प्रत्येकी 56 किलोहून अधिक वजनाच्या 77 पिशव्या (गोणी) बटाटे उत्पादन झाले. याव्यतिरिक्त सुमारे दीड ते दोन गोणी मोठ्या आकाराचे बटाटे उकलल्याने व उकलीमुळे खराब झाल्याने फेकून द्यावे लागले ते वेगळे.

- अशी आहेत वैशिष्ट्ये
ऊस लागवडीनंतर महिन्याने बटाटा लागवड, एका सरीला एक लॅटरल, दोन सर्यांमध्ये चार फुटांचे अंतर, शेणखताचा जोर, लागवड करताना दोन फोडींमध्ये जास्त अंतर ही या पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. निचऱ्याची व थोड्या पोयट्याची एकदम काळीही नाही आणि शेडवाटही नाही अशी मध्यम भारी जमीन, शेणखताचा वापर, प्रत्येक फोडीला पाणी आणि पातळ लागवड असल्याने बटाट्याचा चांगला जोर सापडला. जमीन भुसभुशीत राहीली. मुळ्यांची संख्या भरपूर होती. भर लावताना किंवा थोडी माती बाजूला केली तरी पांढऱ्या मुळ्या भरपूर दिसायच्या. सरीत कुठेही हात घातला तरी बटाटेच सापडायचे. एकेका झाडाला आठ ते दहा बटाटे लागलेले होते, असे दौंडकर अवर्जून निदर्शनास आणून देतात.

- हौशी बटाटा उत्पादक
दौंडकर कुटुंब बैलगाड्याप्रमाणेच बटाटा उत्पादनातही हौशी आहे. आता बैलगाडा बंद झाला असला तरी बटाटा उत्पादन नव्या जोमाने सुरु आहे. वस्ताद दौंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंडकरवाडीमध्ये 20 वर्षापूर्वी सर्वप्रथम त्यांचे वडील कै. मारुती सदू दौंडकर यांनी बटाट्याची लागवड केली. यानंतर हळूहळू गावातील बटाटा क्षेत्रात वाढ झाली. पुर्वी ते सुपर ज्योती, एस वन, के 2, के 3 आदी वाणांचे उत्पादन घेत. गेल्या पाच सहा वर्षापासून ते पोखराज या सुधारीत वाणाचा वापर करतात. उसात आंतरपिक म्हणून यापुर्वी त्यांना कांदा उत्पादन घेतले होते. पण कालांतराने उसाचे नुकसान होते म्हणून आंतरपिक बंद केले होते. बटाट्याने उसाला त्रास होणार नाही अशा हिशेबाने यंदा उसात बटाट्याची लागवड केली. सोबत खाण्यापुरता कांदाही लावला. या दोन्हीमध्ये बटाटा आंतरपिक असलेल्या उसाची वाढ अधिक जोमदार असल्याचे दिसते.

- एकत्र कुटुंब, 10 एकर शेती
दौंडकर यांच्या एकत्र कुटुंबाची 10 एकर शेती आहे. श्रीमती लक्ष्मीबाई मारुती दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाची वाटचाल सुरु आहे. वस्ताद यांजे जेष्ठ बंधू दत्तात्रय मारुती दौंडकर हे पुर्वी शेती पहायचे. पण त्यांना एका अपघातात अपंगत्व आले. सध्या वस्ताद, त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला, दत्तात्रय यांच्या पत्नी सौ. सुशिला, मुलगा पुंडलीक, सुनबाई सौ. मोनाली ही पाच माणसे शेतीत पूर्णवेळ काम करतात.

शेतीमध्ये चार एकर नवीन ऊस, एक एकर खोडवा, एक एकर बाजरी, एक एकर भुईमुग, पाऊण एकर गहू, एक एकर फुलकोबी, अर्धा एकर बटाटा पिक आहे. टोमॅटो लागवडीसाठी बेवोड म्हणून ही बटाटा लागवड केलेली आहे. या क्षेत्रावर येत्या 21-22 मार्चला टोमॅटो लागवड करण्यात येणार आहे. यासाठी रोपांचे बुकींग करण्यात आले असून एक टेम्पो शेणखतही राखून ठेवण्यात आले आहे. एक एकरवर लवकरच फुलकोबीची लागवड करणार आहेत. त्यासाठीचे रोप उगवून आले आहे. सुमारे पाऊण एकर क्षेत्रावर गिन्नी गवत, गावरान मका इ. जनावरांचे खाद्य आहे. शेतीकामासाठी दोन बैल, दुधासाठी दोन म्हशी व एक गावरान गाय अशी जनावरे आहेत. शेणखतासाठी जनावरांचा सर्वाधिक मोठा फायदा होतो.

- पुढच्या वर्षी एक एकराचे नियोजन
आता भरघोस बटाटा उत्पादनाची नेमकी आयडीया सापडली आहे. यामुळे याच पद्धतीने पुढल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये एक चे दीड एकर नवीन ऊस लागवड करुन नोव्हेंबरमध्ये त्यात ठिबकवर बटाट्याचे आंतरपिक घेणार असल्याचे वस्ताद दौडकर यांनी सांगितले. थंडीच्या कालावधीत बटाटे आले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष आहे.

- मका उत्पादनातही हातखंडा
दौंडकर कुटुंबियांचा बटाट्याबरोबर फुलकोबी आणि मका उत्पादनातही हातखंडा आहे. गेली 15 वर्षे फुलकोबीचे तर 10 वर्षापासून स्विटकॉर्नचे दर्जेदार उत्पादन ते घेत आहेत. स्विटकॉर्नचा एका किलो बियाण्याला साडेपाच टन कणसांचे उत्पादन त्यांनी काढले आहे. स्विटकॉर्नचे एकेक कणीस सरासरी 500 ग्रॅम व जास्तीत जास्त 750 ग्रॅमपर्यंत भरत असल्याचे आणि गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये त्यांच्या कणसांना नेहमीच इतरांपेक्षा दोन पाच रुपये सर्वाधिक भाव मिळत असल्याचे दौंडकर आवर्जून सांगतात.

सरी किंवा सारा पद्धतीने दोन ओळीत अडीच फुट अंतर ठेवून लागवड, एकरला दीड किलो बियाणे वापर ही त्यांच्या स्विटकॉर्न उत्पादनाची खासीयत आहे. कोणत्याही पिकाच्या भरघोस उत्पादनात दोन रोपांमधील अंतर हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आसपासचे शेतकरी एकरला दोन ते तीन किलो बियाणे वापरतात. यामुळे पिक दाट होवून कणीस लहान राहते. योग्य अंतर आणि जोडीला शेणखत आणि कोंबडीखताचा पुरेसा वापर यामुळे चांगले उत्पादन मिळते, असे दौंडकर सांगतात.
----------------
*चौकट
- उत्पादन खर्च (12 गुंठे क्षेत्र)
बियाणे (96 किलो) - 3800 रुपये
डीएपी (1 बॅग) - 1240 रुपये
युरिया (अर्धी बॅग) - 200 रुपये
औषधे - 900 रुपये
बारदान (77) - 1700 रुपये
एकूण मजूरी - 3000 रुपये
शेणखत (तीन बैलगाडी) - 1500 रुपये
एकूण खर्च - 12,500 रुपये
------------
*चौकट
- उत्पादन
विक्रीक्षम उत्पादन - सरासरी 65 किलोच्या 77 पिशव्या ः 4312 किलो ः 43.12 क्विंटल
खराबा - दीड ते दोन गोणी ः सरासरी 88 ते 90 किलो ः 0.88 क्विंटल
12 गुंठे क्षेत्रात एकूण उत्पादन ः 4400 किलो ः 44 क्विंटल
बियाण्याच्या एका कट्ट्याला ः सरासरी 39 कट्टे उत्पादन.
प्रति गुंठा उत्पादन - 3.66 क्विंटल
प्रति एकर उत्पादन - 146.4 क्विंटल
प्रति हेक्‍टर उत्पादन - 366 क्विंटल
------------
*चौकट
- विक्री
1) खडकी (पुणे) बाजारात
- पहिल्या दिवशी 21 पिशव्या ः 12 रुपये प्रति किलो दर
- दुसऱ्या दिवशी 25 पिशव्या ः 10 पिशव्या 11 रुपये प्रतिकिलो व 15 पिशव्या 12 रुपये प्रति किलो दर
- तिसऱ्या दिवशी 12 पिशव्या ः 11 रुपये प्रति किलो दर

2) ग्रामस्थांना गावात
- 17 पिशवी - सरासरी 11.30 ते 12 रुपये किलो दराने व 650 रुपये प्रति पिशवी याप्रमाणे

3) घरगुती वापर
- 2 पिशवी (भुगी व मोठा हिरवा बटाटा)

घरगुती वापराव्यतिरिक्तचे उत्पन्न ः
53 पिशव्या (2968 किलो) 12 रुपये प्रति किलो दराने - 35 हजार 616 रुपये,
22 पिशव्या (1232 किलो) 11 रुपये प्रति किलो दराने - 13 हजार 552 रुपये
एकूण उत्पन्न ः 49,168 - 50 हजार रुपये उत्पन्न
------------
*कोट
गेल्या 20 वर्षात असा बटाटा कधीच निघला नाही. जे लोक काढणीला आले, प्रत्यक्ष पाहिले त्यांनाच फक्त विश्‍वास बसतोय. इतरांना खरे वाटत नाही. यामुळे सर्व गोष्टींचे रेकॉर्ड ठेवले. बटाट्याचे सरासरी वजन 500 ग्रॅम भरले. आता याच पद्धतीने यापुढेही बटाटा उत्पादन घेणार आहे.
- वस्ताद दौंडकर, शेतकरी
------------
संपर्क ः वस्ताद मारुती दौंडकर - 9881543398
------------










No comments:

Post a Comment