Tuesday, March 3, 2015

अलका चव्हाण - यशोगाथा

अलकाताईं चव्हाणांची
कुक्कुटपालनात भरारी
--------
एकट्या बाईने पदरात तान्ह पोर असताना अतिशय बिकट अवस्थेतून कुटुंबाला सावरुन शेतीत उल्लेखनिय कामगिरी करण्याचे उदाहरण तसे दुर्मिळ. बारामती तालुक्‍यातील आंबी येथिल अलकाताई चव्हाण यांनी सुरवातीला मोलमजूरी, मग वाट्याने आणि खंडाने शेती आणि कुक्कुटपालनाचा पुरक व्यवसायात भरारी मारुन करुन अतिशय जिद्दीने यश मिळवले आहे. शुन्यातील नव्हे तर उणे अवस्थेतील कुटुंब त्यांनी प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांच्या जगण्याची ही प्रेरक यशोगाथा...
--------
संतोष डुकरे
--------
अष्टविनायकांतील मोरगाव शेजारी आंबी (ता.बारामती) हे अलकाताई चव्हाण यांचे माहेर. वाणेवाडी (ता. बारामती) येथिल तानाजी चव्हाण यांच्याशी 1973 साली त्यांचा विवाह झाला. मात्र नवऱ्याची व्यसने वाढत गेल्याने जेमतेम दीड वर्षाचे वैवाहिक आयुष्य आणि चार महिन्याचा मुलगा (गणेश) पदरात असताना अलकाताईला त्यांचे वडील कृष्णा तावरे कायमचे माहेरी घेवून आले. गणेश सहा महिन्यांचा असताना अलकाबाईंचे वडील वारले आणि स्वतःबरोबरच आईचाही संसार सावरण्याची वेळ अलकाताईंवर आली.

वडीलांची चार पाच एकर जमीन होती पण ती बीन पाण्याची. वर्षानुवर्षे पडीक. (अजूनही ती तशीच आहे.) मायलेकींना मोलमजूरी केल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. दोघी मोलमजुरी करायच्या, आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमीनी वाट्याने करायच्या आणि घर चालवायच्या. स्वतःच्या व पोरांच्या पोटाची खळगी आणि शिक्षणाची भूक भागवायच्या. गणेश उरुळीला तीन वर्षे एकच चड्डी व एकाच शर्टावर तो शिकत होता. शाळेतले मित्र त्याला मदत करायचे. शिकत होता तेवढी वर्षे त्याने आईला एकही सण करु दिला नाही. गोडधोडही नको म्हणायचा. त्याऐवजी आपण एखादी वस्तु घेवू कामाला येईल म्हणायचा. जिद्दीने शिकून तो बी कॉम झाला. पुण्यात छोटीमोठी नोकरी करु लागला.

मध्यंतरी अलकाताईंच्या पाठच्या भावाचे निधन झाले. दुसरा भाऊ पुण्यात पीएमटीमध्ये वाहक (कन्डक्‍टर) म्हणून काम करत होता. त्याचीही कमाई बेताची. यामुळे आईचा संसारही जेमतेमच चाललेला. जुनं घरंही मोडकळलेलं. यामुळे दोघी मायलेकी चुलत भावाकडे राहत होत्या. याच परिस्थितीत गावातीलच हनुमंत शिर्के यांच्या मुलगी भाग्यश्री हिच्याशी गणेशचा विवाह झाला. शिर्केंनी लेकीला बारामती जेजूरी रस्त्याच्या दोन्ही बाजूची 10 गुंठे जमीन आंदन म्हणून दिली. लग्न झाल्यानंतर या जमीनीच्या एका भागात पत्र्याचे शेड टाकून या स्वतंत्र घरात रहायला गेले. गणेशचा पुण्यात कामधंद्याचा संघर्ष चालु होता.

गणेशचा आईला आग्रह होता, पुण्याला चल. पण एकटं पोरगं कमावतं. पुण्याला जावून बसून राहण्यापेक्षा इथंच शेतीत काहीतरी जोडधंदा करुन मुलाच्या संसाराला हातभार लावावा, असं अलकाताईंच्या मनात घोळत होतं. घराजवळच गणेशच्या बालमित्राची संतोष शिंदे याची पोल्टी होती. येता जाता मोकळ्या वेळात पोल्ट्रीची सर्व कामे अलकाताईंनी बारकाईने पाहीली होती. ते पाहून त्यांनी मनाशी निश्‍चय केला. आता मोलमजूरी बास... आपणही कुक्कुटपालनच करायची !!!

कुक्‍क्‍टुपालन करायचे नक्की झाल्यावर करार पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी गणेशने अलकाताईंना बारामती ऍग्रोचे प्रमुख राजेंद्र पवार यांची भेट घालून दिली. श्री. पवार यांनी त्यांना बारामती ऍग्रोच्या कुक्‍कुटपालकांमध्ये समावेश करुन घेतले. शेड बांधायचे तर हातात पैसे काहीच नव्हते. नुकतेच लग्न झालेले. मग शेवटी लग्नात केलेली गणेशची अंगठी, भाग्यश्रीचे दागिणे मोडून आग्रहाने व तिचे लग्नात केलेले सर्व दागिणे मोडून भांडवल उभे केले. सुमारे 100 फुट लांब व 22 फुट रुंद आकाराचे शेड उभारण्यासाठी दीड पावणेदोन लाख रुपये खर्च आला. दहा वर्षापूर्वी लोखंड सिमेंट स्वस्त होते. सिमेंटची गोणी 35 रुपयांना होती. विटा व खांब जुने वापरले. यामुळे तुलनेत कमी खर्च आला. अडीच हजार पक्षी क्षमतेचे शेड तयार झाले.

बारामती ऍग्रोमार्फत त्यांना पिले पुरवली जातात. पक्षांचे खाद्य, डॉक्‍टर, औषधे आदी सर्व सुविधाही घरपोच पुरवल्या जातात. पिलांना उब देण्यासाठी रात्री दिवे लावायचे. त्यांना खाद्य, पाणी वेळोवेळी द्यायचे. पाण्याची टाकी, भांडी धुवायची दररोज धुवायची. पिण्याच्या पाण्यात औषधे टाकायचे. दररोज पक्षांखालचे तुस खुरप्याने हलवायचे. मर झाल्यास ती पिले बाजूला काढून ठेवायची. डॉक्‍टरला दाखवून मग नष्ट करायची. असा अलकाताईंचा दिनक्रम सुरु असतो. पक्षी गेल्यानंतर पुन्हा संपूर्ण शेड धुवायचे, चुना भिजवून सडा मारायचा, हातपंपाने औषध फवारणी करायची ही शेडची निगा ठेवण्याची कामे त्या स्वतः करतात.

कोंबड्याखाली टाकण्यासाठीचे तुस त्यांना विकत घ्यावे लागते. प्रत्येक लॉटला 500 किलो तुस लागते. सात रुपये किलोने एका लॉटला साडेतीन हजार रुपयांचे तुस होते. सरतेशेवटी लॉट गेल्यानंतर एक ट्रॉली कोंबड खत निघते. ते तीन हजार रुपयांना जाते. पिल्लांना पहिली 15 दिवस गुळपाणी पाजावे लागते. त्यासाठी 5-6 किलो गुळ लागतो. सहाव्या व बाराव्या दिवशी पिलांच्या डोळ्यात लसीकरण करायचे. तिसरा डोस 20 व्या दिवशी पाण्यातून असतो. त्यानंतर फक्त पाण्यातून रोगप्रतिकार क्षमता टिकविणारी औषधे दिली जातात. प्रत्येक झापात 200 चे तीन याप्रमाणे शेडमध्ये एकूण 18 सीएफएल बल्ब लावण्यात आले आहे. थंडी असेल तेव्हा दिवसरात्र व इतर वेळी संध्याकाळी सहा ते सकाळी उजेडेपर्यंत बल्ब लावतात. दरमहा 500 रुपये लाईट बिल येते.

पक्षी खरेदीच्या वेळी जिवंत पक्षांचे वजन करुन त्यानुसार संगोपनाचा खर्च दिला जातो. सुरवातीला एका बॅच चे पाच ते आठ हजार रुपये मिळायचे. गेल्या दोन वर्षात यात चांगली वाढ झाली असली तरी दर बदलत राहतात. सरासरी एका कोंबडीला पाच ते दहा रुपये मिळतात. क्वचित वेळी मर जास्त झाली, वजने भरली नाहीत तर संपूर्ण लॉटमध्ये काहीही साधत नाही. गेल्या तिसऱ्या लॉटमध्ये पक्षी कमकुवत असल्याने लहानपनापासूनच मर झाली. लॉटमध्ये 250 पक्षी मेले. पिलांनी खाद्य भरपूर खाल्ले पण वजने आली नाहीत. यामुळे संपूर्ण पक्षी संगोपन करुनही एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. सर्व कष्ट वाया गेले. अधेमध्ये अशी वेळ येत असते, धिर सोडून चालत नाही. गेल्या वर्षी एका 1600 पक्षांच्या लॉटला आत्तापर्यंतचा सर्वाधिक 31 हजार रुपयांचे चेक निघाला.

सर्वसाधारणपणे 40 ते 45 दिवस पक्षी सांभाळावे लागतात. बाजारात दर नसेल तर 50 ते 55 दिवसही पक्षी शेडमध्ये राहतात. वर्षात किमान एकदा तरी अशी स्थिती उद्भवतेच. एका वर्षात सहा लॉट निघतात. सरासरी प्रत्येक लॉटला 15 हजार रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 90 हजार रुपये उत्पन्न मिळते. गेल्या दहा वर्षात स्वअनुभवातून अलकाताईंनी कुक्‍क्‍टुपालनात प्राविण्य मिळवले असून आर्थिकदृष्ट्याही चांगला जम बसवला आहे. कष्टाचं चिज होत असल्याने पोल्ट्रीने सुख दिलेय असे त्या आवर्जून सांगतात.

- मदतीचे हात...
कुकुटपालनासाठी मावडीचे हरिभाऊ जगताप कुटुंबियांची अलकाताईंना वेळोवेळी मदत होते. उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यावर विकत घ्यावे लागते. सात हजार लिटरचा एक टॅंकर आठ दहा दिवस पुरतो. जगताप यांच्यामार्फत टॅंकरच्या भाड्यात पाणी पुरवठा होतो. विजेची काही अडचण उद्भवल्यास जगताप कुटुंबातील कोणी ना कोणी मदतीस येते. बारामती ऍग्रो कंपनीचे पक्षि वाहतूक करणारे लोकही अलकाताईंना पक्षि उतरवायला, गाडीत भरायला मदत करतात. पक्षि भरण्यासाठी तशी आठ माणसे, डॉक्‍टरशेजारी एक माणस व वजन काट्यावर एक माणूस लागतो. कंपनीचे गाडी चालक व इतर लोक पक्षी गाडीत उतरवायाला, चढवायला मदत करतात. इतर ठिकाणी फक्त गाडी उभी करुन थांबतात पण मला चांगली मदत करतात. पैसे थेट बॅंकेत जमा करतात. पिले भरायला 8 लोक लागतात. शेडमध्ये चार व काट्यावरुन गाडीत टाकायला चार. एक माणूस घरचं लागतं डॉक्‍टरशेजारी बसायला. अलकाताईंना लिहीता वाचता येत नाही. तेव्हा जगताप भाऊच ही जबाबदारी पार पाडतात.

- खंडाने शेती, एकहाती काम
पोल्ट्रीच्या प्रत्येक कामात प्राविण्य मिळविल्याने अलकाताईं दिवसभरात फक्त दोन तासात पोल्ट्रीची सर्व कामे उरकतात. तेवढं करुन उरलेल्या वेळात त्या इतर शेतकऱ्यांकडे वाट्याने शेतमाल करतात. मध्यंतरी त्यांननी दहा हजार रुपये एकर दराने साडेतीन एकर जमीन खंडाने घेतली होती. पाच वर्षे त्यात त्यांनी ऊस, बाजरी, कांदे, गहू आदी पिकांचे एकहाती भरघोस उत्पादन मिळवले. ऊस लागवड, पाणी भरणे ही सर्व कामे त्या एकटीनेच करत रहायच्या. क्वचित कधी काम आवाक्‍याबाहेर जावू लागले तरच मजूर घ्यायचे अन्यथा एकटीची झुंज जिद्दीने सुरु असायची. कांद्याला जास्त बाजार असेल तर मजुर घ्यायचे. अन्यथा दिवसा कांदे उपटून रात्री ते दारात बसून काठायच्या. लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व पिकांची कामे त्या एकटीने एकहाती सांभाळायच्या.

- उपत्या कामांचाही सपाटा
मोकळा वेळ घालवायचा नाही. काही ना काही काम करत रहायचं हा अलकाताईंचा शिरस्ता. यंदा त्यांनी गावातीलच एका शेतकऱ्याची दीड एकर ज्वारी काढणीचे काम घेतले होते. पोल्ट्रीचे काम सांभाळत हे काम त्यांनी एकटीने अवघ्या 12 दिवसात पूर्ण केले. दिवस उजाडायच्या आत त्या ज्वारी उपटायला सुरवात करायच्या. आठ साडेआठला घरी यायच्या. यात 700 पेंढ्या कडबा निघाला. हा सर्व कडबा त्यांनी दुपारी तीन वाजता जावून दोन दिवसातच बांधला. मळणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांने ज्वारीचे प्रत्येकी 50 किलो वजनाच्या पाच गोणी घरी आणून दिल्या. ज्वारीप्रमाणेच इतर पिकांचीही काढणीची कामे त्या करतात. हरभरा 19 कडपांवर एक कडपं याप्रमाणे काढणीस घेतात. एका कडपात सात-आठ मोठ्या उठी हरभरा निघतो. ज्वारी, हरभऱ्याप्रमाणेच गहू, बाजरी आदी धान्यही त्याचे त्यांना काढणीच्या वाट्याचे मिळते. यामुळे मुलाला शहरात धान्य विकत घ्यावे लागत नाही, याचे मोठे समाधान या माऊलीच्या रापल्या चेहऱ्यावर झळकत असते.

- घरगुती पशुपालनही फायद्याचे
शेती, पिक काढणी, पोल्ट्री या सर्व व्यापात अलकाताईंनी घरगुती शेळीपालनातूनही संसाराला पै पै जोडली आहे. गेल्या वर्षी त्यांनी साडेतीन हजाराची शेळी विकत घेतली. तिला दोन करडे झाली. ती पाच हजार रुपयांना विकली. त्यातून साडेतीन हजाराची दोन लहान मेंढ्या विकत घेतल्या. सात आठ महिने सांभाळल्यानंतर या मेठ्या साडे अकरा हजार रुपयांना विकल्या. याच काळात शेळीला पुन्हा दोन बोकड झाले. ते ही नऊ हजार रुपयांना विकले. एवढे उत्पन्न एका शेळीने वर्षात दिल्यानंतर आता पुन्हा ही शेळी व्यायला झाली आहे.

- नातवंडांसाठी गावठी कोंबडीपालन
नातवंडांना खाण्यासाठी घरच्या कोंबड्यांची अंडी असावीत म्हणून त्यांनी 12-15 गावठी कोंबड्याही पाळल्या आहेत. गावठी कोंबडी अडीचशे ते तीनशे रुपयांना विकली जाते. पिल्ले काढली की सहा महिन्यांनी कोंबड्या अंड्यावर येतात व वर्षात विकण्यायोग्य होतात. अंडी विकत नाहीत. पुण्याला नातवंडांना पाठवतात. मुलगा आईला पुण्याला यायचा आग्रह करत असतो, आमच्यासाठी आता कष्ट बास कर. आराम कर म्हणत असतो... पण शेरडं करडं कोंबड्या सोडून कुठं जायचं ? असा अलकाताईंचा सवाल असतो. मुलगा आठवडा, पंधरा दिवसाला येत असतो. सुट्ट्यांच्या काळात सुन नातवंडे गावाला येतात.

- कशासाठी पोरासाठी, नातवंडासाठी
प्रथम स्वतःच्या मुलासाठी आणि आता नातवंडांसाठी अलकाताईंचा कामाचा धबडगा सुरुच असतो. मालाचे, मजूरीचे, कुक्कुटपालनाचे पैसे हाती आले की लेका सुनेच्या हाती टेकवतात. थोडंफार दागिने घ्या, पोरांच्या शाळेवर खर्च करा असेही वेळोवेळी सांगतात. गेल्या काही वर्षात पै ला पै जोडून त्यांनी पुण्यात खोली घेतली. गणेशनेही त्यासाठी नोकरीवर काही कर्ज काढले. सुनबाई पुण्यात घरीच कपडे शिवण्याचे काम करुन कुटुंबाला हातभार लावते. खोलीचे कर्ज फेडल्यानंतर त्यांनी पुण्यातच कात्रजला अर्धा गुंठा जागा घेतली. त्यावर घराचे बांधकाम केले. जुनी खोली भाड्याने दिली. पदराची गाठ नेहमीच मोकळी ठेवून मुलाची, नातवंडांची सोय करुन ठेवली. जे काही आहे ते मुलासाठी, नातवंडांसाठी... मला तरी दुसरं कोण आहे, हे त्यांचे शब्दच त्यांचे समर्पित जगणं स्पष्ट करुन जातात. कुटुंबाला जमीन नाही काही नाही... नातवंडं शिकली तरच त्यांची पोटं चालतील. नाही शिकली तर काय करणार इथे येवून असं म्हणत त्यांना चांगले शिकवायची, घडवायची जिद्द धरुन पन्नाशी ओलांडल्यावरही तिशी पस्तिशीच्या जोमात अलकाताईंचा कामाचा उरक सुरु असतो.
---------------









No comments:

Post a Comment