Thursday, March 12, 2015

गारपीटीने नुकसान ८ लाख हेक्टरवर

वादळी वारा, गारपीटीने आणखी
40 हजार हेक्‍टर पिके भुईसपाट

दहा दिवसात 8 लाख हेक्‍टरला फटका

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात आठ दिवसांपुर्वी गारपीटीने झालेल्या साडेसात लाख हेक्‍टर पिकांच्या नुकसानीपाठोपाठ गेल्या पाच दिवसात वादळी वारे व गारपीटीमुळे नऊ जिल्ह्यांत आणखी 40 हजार हेक्‍टरवरील शेतीपिके व फळपिके भुईसपाट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, डाळींब, पपई आदी पिकांना या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. नुकसानीच्या प्रमाणात व पातळीत आणखी वाढ होण्याचाही धोका आहे.

गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे दररोज होणाऱ्या नुकसानीचा आढावा कृषी आयुक्तालयामार्फत घेण्यात येत आहे. आठ ते दहा मार्च या कालावधीत राज्यात गारपीटीने 30 हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसल्याचे कृषी मंत्रालयामार्फत स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात झालेली गारपीट आणि अद्ययावत माहीती यामुळे गुरुवारी या नुकसानग्रस्त क्षेत्रात आणखी 10 हजार हेक्‍टरची भर पडली. गेल्या अवघ्या दहा दिवसात आठ लाख हेक्‍टर पिके गारपीटने उध्वस्त झाल्याची स्थिती आहे.

गारपीटीचा सर्वाधिक फटका विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम व अकोला या चार जिल्ह्यांना बसला असल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यात नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीत विदर्भाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त पिकांमध्ये द्राक्ष, डाळींब व कांदा या पिकांच्या नुकसानीची तिव्रता सर्वाधिक आहे. पाठोपाठ ज्वारी, हरभरा, पपई व गहू या पिकांचेही नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गव्हाचे नुकसान मोठे आहे. मात्र वाढीच्या अवस्थेत असलेला गहू पसरल्यानंतर पुन्हा उभा राहण्याची शक्‍यता असल्याने अशा पिकाची नुकसानीची तिव्रता कमी होण्याची शक्‍यता कृषी विभागामार्फत व्यक्त करण्यात आली आहे.

- केंद्राचे पथक पहाणी करणार ?
दरम्यान, गेल्या पाच दिवसांत गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लवकर केंद्रीय कृषी विभागाचे पथक किंवा एखादा अधिकारी दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. अमरावतीसह काही गारपीटग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांमार्फत नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. गारपीट व नुकसान सुरुच असल्याने मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांमार्फतही नुकसानग्रस्त भागाची पहाणी होण्याची शक्‍यता आहे.

*चौकट
- जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्‍टर)
यवतमाळ - 13000, वाशिम - 13000, अमरावती 6000, सांगली 3000, अकोला - 3000, नगर 1800, सातारा 900, सोलापूर 650, नांदेड 250

*चौकट
- जास्त नुकसानीचा भाग
पारनेर, पाथर्डी (नगर), माण, खटाव (सातारा), पलूस (सांगली), अक्कलकोट (सोलापूर), मानोरा, मंगरुळपीर (वाशिम), तिवसा,भातकुली (अमरावती), यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जास्त नुकसान आहे.
------------- 

No comments:

Post a Comment